हदगाव (नांदेड ) : देशाला स्वातंत्र्य मिळाले तरीही मार्लेगाव-कोळी, नेवरी-कोळी या गावांना रस्तेच नव्हते़ त्यामुळे हदगाव तालुक्यात असूनही बाजारपेठेसाठी कळमनुरी तालुक्यातील बाळापूरला तर नांदेडला जाण्यासाठी ३० कि़मी़ जादा अंतर कापून जावे लागायचे. आता मार्लेगाव-कोळी या रस्त्याला नाबार्डमधून सात कोटी रुपये मंजूर झाल्याने आडमार्गाची २५ गावे राज्य महामार्गाला जोडली जाणार आहेत, अशी माहिती आ. नागेश पाटील यांनी दिली.
उंचाडा गावाजवळील कयाधू नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यामध्ये सात-आठ गावांचा संपर्क तुटतो, आता या गावांनाही या मार्गाचा चांगला उपयोग होणार आहे़ नेवरी गाव दोन समाजातील तेढसाठी राज्यात गाजले पण हा तणाव निवळत या गावालाही रस्ते करीत मुख्य प्रवाहात आणण्यात आले. नेवरी-कोळी रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने शेतक-यांना बाजारात येणे सोपे झाले आहे. यापूर्वी हा रस्ता चिखलात रुतलेला असायचा. शेतातील माल हिवाळ्याशिवाय घरी आणता येत नसे़ आता मात्र दर पाच मिनिटाला घरी तर दुसºया पाच मिनिटात शेतात अशी परिस्थिती झाली. येथील अनेक शेतक-यांनी वीजजोडणी घेवून शेतामध्ये घरे बांधणे सुरू केले आहे. गावात जनावरांना जागा नसल्याने व शेतात आता मुख्य रस्ता झाल्याने त्यांना तिथे राहणे सोयीचे झाले आहे. असाच एक मार्ग चिंचगव्हाण-कार्ला-खरबी-केदारनाथ- तामसा असा झाल्याने आडमार्गावरील खरबी, कार्ला, चोरंबा, केदारनाथ ही गावे १०-२० मिनिटांमध्ये नांदेड-नागपूर राज्य मार्गावर आली आहेत.
मार्लेगाव, उंचाडा, पिंपरखेड, कोळी या पट्ट्यातील शेतकरी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात़ त्यांना वाहतुकीसाठी हा रस्ता सोयीचा होणार आहे़ याच कोळी-मार्लेगाव-निवघा जाण्यासाठी १०-२० मिनिटे लागतात़ मात्र रस्त्याअभावी मानवाडीफाटा-निवघा असा उलटा प्रवास करावा लागत असे़ या रस्त्याचे टेंडर झाले असून एक-दोन महिन्यांत कामालाही सुरुवात होणार असल्याची माहिती आमदारांनी दिली़ गायतोंड-मनाठा हा मार्गही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झाला़ त्याचप्रमाणे विठ्ठलवाडी-ठाकरवाडी-रावणगाव-तामसा हा मार्गही झाला़ ठाकरवाडी-सावरगाव हा मार्ग मंजुरीसाठी टाकल्याचेही त्यांनी सांगितले़ रखडलेले मार्ग मार्गी लागले तर अनेक प्रश्न सुटणार, हे निश्चित़ विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय होणार आहे.
२०-२५ गावांना हदगाववरुन नांदेड ये-जातळणी व निवघा या मंडळातील २०-२५ गावांना हदगाववरून नांदेडला ये-जा करावी लागते़ त्यामुळे वेळ जास्त लागत असून आर्थिक भूर्दंडही बसत आहे. परंतु गेली अनेक वर्षांपासून रखडलेला कोळी-मार्लेगाव-पिंपरखेड-निवघा रस्ता मंजूर झाला आहे़ यामुळे तळणी, निवघा, उंचेगाव, आमगव्हाण, वाकी, मरडगा, हस्तरा-बोरगाव, शिरड, पेवा, चक्री, कोहळी, साप्ती, माटाळा, कोळी, नेवरवाडी, नेवरी या गावांंना नांदेडचा प्रवास करण्यासाठी ३० कि़मी़ लांबीचा फेरा कमी होणार आहे़ तळणी-निवघा सर्कलची गावे १५-२० कि़मी़ अंतरामध्ये सरळ बामणी फाट्यावर कोळी-मार्लेगाव-पिंपरखेड मार्गे येणार आहेत़ यामुळे या फाट्याची बाजारपेठ वाढणार आहे़ पुढील काळात रेल्वे स्टेशनचा फायदाही या गावांना निश्चितच मिळणार आहे.