नांदेड : नांदेड शहरातील मोमीनपुरा भागातून शुक्रवारी पाच मुले अचानक बेपता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. रात्रभर पोलिसांनी त्या मुलांचा शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. आज दुपारी ते पाचही जण स्वत:हून सुखरूप परत आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
या बाबत अधिक माहिती अशी की, मोमिनपुरा येथील शाबाज शहा, अब्दुल शाह, शेख समीर, मोहमद रेहान आणि सय्यद जुबेर हे 8 ते 10 वर्ष वयोगटातील मुले परिसरात खेळत होते. काल दुपारनंतर पाचही जण अचानक बेपता झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी इतवारा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. पोलीस आणि बेपत्ता मुलांच्या नातेवाईकानी रात्रभर त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा शोध लागला नाही. यामुळे शहरात चर्चेला उधाण आले होते.
दरम्यान, आज सकाळी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी पोलिसांचे एक पथक मालटेकडी स्थानकावर गेले. तेव्हा त्याच ठिकाणी हे पाचजण पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्यांना लागलीच इतवारा पोलीस ठाण्यात आणून पालकांच्या स्वाधीन केले. पाचही मुले सुखरूप परत आल्याने पोलीस आणि पालक यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
रेल्वे पाहायला गेले होते काळ खेळत असताना रेल्वे गाडी पाहण्यासाठी म्हणून हे पाच मित्र रेल्वे स्थानकावर गेले. गंमत म्हणून ते एका रेल्वे गाडीतही बसले, तितक्यात गाडी निघाली व रात्री सर्वजण पूर्णा रेल्वे स्थानकावर थांबली. येथे पाचही जन उतरले मात्र त्यांना परत येण्यासाठी गाडी मिळाली नाही. रात्रभर येथेच थांबलेल्या या मुलांची सकाळी लोकांनी विचारपूस केली. खरी माहिती कळातच नागरिकांनी त्यांना सकाळच्या नांदेडला जाणा-या रेल्वेत बसवले.