नांदेड-अडचणीच्या काळात सावकाराकडून हात उसने पैसे घेतले होते. त्यानंतर सावकाराला घेतलेल्या रक्कमेपेक्षा अधिक पैसे देवूनही त्याचा जाच वाढतच गेला. त्यामुळे पाच एकर जमीन असतानाही गाव सोडून पळ काढला. आता सावकराला पैसे देण्यासाठी पाच किडण्या विकायच्या आहेत, अशी जाहिरातच एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भितींवर डकवली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुदखेड तालुक्यातील वाईवरदड या गावातील हे कुटुंब आहे.
पाच एकरमध्ये फुलांची शेती करुन उत्पन्न चांगले मिळत होते. परंतु कोराेना काळात सर्वच ठप्प झाल्याने सावकाराकडून दोन लाखांचे कर्ज घेतले. कोरोना नंतर पुन्हा शेती करुन सावकाराला दोन लाखापेक्षा अधिकची रक्कम दिली. परंतु त्यानंतरही सावकाराकडून पैशासाठी धमकाविणे सुरुच होते. त्याच्या भितीपोटी मोबाईल क्रमांकही बदलला. परंतु त्याचा जाच कमी झाला नाही. त्यामुळे पाच लेकरांना घेवून या कुटुंबाने नांदेड सोडून मुंबई गाठली. तिथे धुणी-भांडी केली. परंतु आम्हाला आता गावी जावून शेती करायची आहे. त्यामुळे सावकार मागेल तेवढे पैसे द्यायचे आहेत. त्यासाठी पाच मुलांपैकी ज्याची किडणी कुणाला फिट बसत असेल तर ती विकायची आहे, असेही पिडीत महिलेने सांगितले. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरच त्यांनी जाहिरात डकवली. त्याखाली आपला मोबाईल क्रमांकही नमूद केली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.