नांदेड : मुखेड येथे एका कारमध्ये ठेवलेले रोख साडेपाच लाख रुपये लंपास केल्याची घटना ३ जून रोजी घडली़ तर नांदेडमध्ये एका व्यापाऱ्याच्या गळ्यातील चैन आणि रोख ७० हजार रुपये ३ जूनच्या रात्री लंपास केले़
मुखेड येथे रजिस्ट्री आॅफीसच्या जवळ उभ्या केलेल्या एका कारचा काच फोडून रोख साडेपाच लाख रुपये लंपास करण्यात आले़ उदगीर तालुक्यातील वाढवणा बु़ येथील माधव तानाजी मुंडकर (वय ३२) हे अहमदपूर येथून शेताची रजिस्ट्री करून घेण्यासाठी एम़एच़२४-व्ही़१२८८ क्रमांकाच्या कारने नातेवाईकासह मुखेड येथे आले होते़ मुखेड येथील रजिस्ट्री आॅफीसच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत त्यांनी आपली गाडी उभी केली़ ते रजिस्ट्री आॅफीसमध्ये चर्चा करीत असताना एका इसमाने कारच्या काचा फोडून गाडीतील पिशवीत ठेवलेले रोख ५ लाख ५०हजार रुपये लंपास केले़ या प्रकरणी मुखेड ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़
नांदेड येथील दरोड्याच्या घटनेत शहरातील गोकुळनगर येथे श्रीनिवास माणिकराव चिटमनकर हे सराफा व्यापारी ३ जूनच्या रात्री दुकान बंद करून दुचाकीवर घरी आले़ घरामध्ये गाडी उभी करत असताना जीपमध्ये आलेल्या आरोपींनी चिटमनकर यांच्या गळ्यातील सोन्याची चैन तसेच रोख ७० हजार रुपये जबरीने हिसकावले़ १ लाख ४५ हजार रुपयांच्या या चोरी प्रकरणात चिटमनकर यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास उपनिरीक्षक पठाण करीत आहेत़