नांदेड : मुदखेड ते नांदेड या महामार्गावर मुगटजवळ ३० मार्च रोजी अपघातात मृत्यू पावलेल्या पाच जणांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
कामाचा शोधासाठी नांदेडकडे निघालेल्या मजुरांच्या ऑटोरिक्षाला मुदखेड तालुक्यातील मुगट ते इंजाळी रस्त्यावर ट्रकची जोरदार धडक लागली होती. ३० मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये पाच मजुरांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले होते. जखमींना तातडीने शासकिय रूग्णालयात उपचार करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणाला दिले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अपघाताची दखल घेतली असून, अपघातात मृत्यू पावलेल्या पाच व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
अपघातातील मयत मुगटजवळ झालेल्या अपघातामध्ये गालीअम्मा कल्याण भोई (२४), वेजल कल्याण भोई (७ महिने, दोघे रा. गेवराई, जि. बीड), पुंडलिक बळीराम कोल्हाटकर (७०,रा. सावरगाव माळ, ता.भोकर), ज्योती रमेश भोई (३२, रा.पवनसुत नगर डोणगाव, जि. बुलढाणा) आणि विद्या संदेश हटकर (३७, रा. इजळी, ता.मुदखेड) या पाच जणांचा समावेश आहे.