हदगाव/इस्लापूर (जि. नांदेड) : दोन भावांतील मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाने पत्नी, दोन मुली व एका मुलासह सहस्रकुंड धबधब्यात उडी घेतल्याची घटना गुरुवारी घडली. यातील तिघांचे मृतदेह हाती लागले. दोन्ही मुलींचा शोध उशिरापर्यंत सुरूच होता. प्रवीण भगवानराव कवानकर (४२), त्यांच्या पत्नी अश्विनी (३८), मोठी मुलगी सेजल (२०), समीक्षा (१४) व लहान मुलगा सिद्धेश (१३) अशी मृतांची नावे आहेत.
भगवानराव कवानकर हे कवाना (ता. हदगाव) येथील प्रतिष्ठित व्यापारी असून त्यांचे हदगाव येथे मोठे किराणा दुकान आहे. त्यांच्या दोन मुलात मालमत्तेचा वाद सुरू होता. या वादाला कंटाळून मोठा मुलगा प्र्रवीण यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. दोन दिवसांपूर्वी हदगाव येथून चारचाकी वाहन भाड्याने घेऊन कवानकर कुटुंब सहस्त्रकुंड येथे पोहचले होते. आमचा मेहुणा येत आहे, असे सांगून त्यांनी वाहन परत पाठविले होते. मुरली गावानजीक धबधब्यात गुरुवारी पाचही जणांनी उड्या मारल्या. प्रवीण यांचा मृतदेह इस्लापूरनजीक तर मुलगा सिद्धेश व अश्विनी यांचा मृतदेह दराटी परिसरात आढळून आला.