नांदेड : नांदेड शहरात व परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या गुन्हेगार रिंधाला पकडण्याचे आपले पहिले उद्दिष्ट असल्याचे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी स्पष्ट केले़ स्थानिक गुन्हा शाखेने शुक्रवारी रात्री कारवाई करत पाच गुन्हेगारांना ताब्यात घेतले़ याबाबत गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली़
स्थानिक गुन्हा शाखेचा पदभार स्वीकारल्यानंतर गाडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार ६ सप्टेंबरच्या रात्री विमानतळ हद्दीत नवीन बायपास ते देगलूरनाका जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे अंडरग्राऊंड पुलाजवळ काही इसम दबा धरून बसल्याची माहिती मिळाली़ या माहितीवरून शनिवारी पहाटे २़३० वाजता छापा मारून संदीपसिंघ उर्फ बब्बु कुलदीपसिंग संधू (वय २७), परविंदरसिंघ उर्फ पप्पी हिरासिंघ बंजरा (वय २६), करणसिंघ उर्फ करण नानकसिंघ गील (३३), विक्रमसिंग उर्फ विकी हरजीतसिंघ जाधव (२९) आणि लखनसिंघ दशरथसिंघ ठाकूर (२६) या पाच जणांना धारदार व घातक शस्त्रासह अटक करण्यात आली़ त्यांच्याकडून दोन मोटरसायकलही जप्त करण्यात आल्या़ यातील लखनसिंघ ठाकूरविरूद्ध वजिराबाद ठाण्यात खंडणी, अर्धापूर ठाण्यात खूनाचा गुन्हा तसेच नांदेड ग्रामीण व इतवारा ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले.
या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक पांचाळ, जाधव, भारती, घोळ, गोविंद मुंडे, ईश्वर चव्हाण, संजय केंद्रे, भानुदास वडजे, अफजल पठाण, बालाजी पोतदार, शाहू, तानाजी येळगे, बजरंग बोडके आदींचा समावेश होता़ उपरोक्त पाच जणांविरूद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़ आगामी काळात स्थानिक गुन्हा शाखा जिल्ह्यातील अवैध धंद्यावर आळा घालेल असा विश्वास गाडेकर यांनी व्यक्त केला़ त्यातच कुख्यात गुन्हेगार रिंधाला पकडण्याचे प्रथम उद्दिष्ट असल्याचेही गाडेकर यांनी स्पष्ट केले़ याबाबत स्थानिक गुन्हे शाखा सक्षम असल्याचेही ते म्हणाले़ यावेळी नूतन जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अण्णाराव पवार यांचीही उपस्थिती होती़
डॉ क़त्रुवारांना खंडणी मागणारे गुन्हेगार फरारस्थानिक गुन्हा शाखेने शनिवारी पहाटे केलेल्या कारवाईत पाच जणांना जेरबंद केले असले तरीही नांदेड येथील डॉक़त्रुवार यांना ५० लाखांची खंडणी मागणारे कमलप्रितसिंघ उर्फ कमल, अमरजितसिंघ संधू आणि बलप्रितसिंघ उर्फ आशिष नानकसिंघ सपुरे हे दोघे आणि व्यावसायिक आशिष पाटणी आणि परमीट रुम चालक सुरेश राठोड यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या प्रेमसिंघ उर्फ पम्या, विठ्ठलसिंघ सपुरे हे तिघे मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या हातून निसटले आहेत़ त्यांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढल्याचे सांगण्यात आले़