नांदेड : शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोना पसरला होता; परंतु आता सगळीकडेच कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत आहेत. परंतु, त्यानंतरही जिल्ह्यातील एकही तालुका अद्याप पूर्णपणे कोरोनामुक्त झाला नाही. एक-दोन दिवस रुग्ण आढळत नसला तरी पुन्हा एखाद-दुसरा रुग्ण सापडत आहे. त्यामुळे कोरोना निरंक असलेला तालुका सध्या तरी नांदेड जिल्ह्यात नाही.
जिल्ह्यात आता कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळत आहेत. ग्रामीण भागातही काही ठिकाणी एक अंकी रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातही ग्रामीण भागातील काहीजण अहवाल बाधित आल्यानंतर उपचारासाठी नांदेडला येत आहेत. त्यामुळे कोणताही तालुका पूर्णपणे कोरोनामुक्त झाला असे म्हणता येणार नाही. परंतु, ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे.
अनेक तालुके निरंकच्या दिशेने पुढे
जिल्ह्यात धर्माबाद, बिलोली, मुदखेड, किनवट, अर्धापूर यासारखे तालुके कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. या ठिकाणी क्वचितच कोरोनाचे बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होण्याचा मान कोणत्या तालुक्याला मिळतो हे औत्सुक्याचे ठरणार आहे.