- अनुराग पोवळे
नांदेड - परतीच्या पावसाने मराठवाड्यातील जायकवाडीसह अन्य गोदावरी नदीवरील अन्य प्रकल्प तुडूंब भरले असल्याने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परिणामी ऐन दिवाळीत नांदेडकरांवर पुराचे संकट ओढवले आहे. नांदेड शहराजवळ गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सद्यस्थितीत गोदावरीची पातळी 353 मीटर इतकी आहे. 351 मीटर धोक्याची पातळी आहे. दुपारी 2 च्या सुमारास विष्णुपुरी प्रकल्पातून जवळपास 2 लाख क्यूसेक्स वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे पुराचा धोका आणखी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
परतीच्या पावसाने जिल्ह्यात पाण्याची चिंता मिटवली आहेच पण अनेक भागात पुराने थैमान घातले आहे. 21 ऑक्टोबरपासून सातत्याने पाऊस होत आहे. या पावसाने जिल्ह्याची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. जायकवाडीसह दिग्रस बंधाऱ्याचे दरवाजे उघडले असल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडण्यात आले आहेत.दरम्यान, जिल्हाधिकारी डोंगरे यांनी शुक्रवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली. गोदावरी नदीवरील नांदेड शहरातील नावघाट भागातील संत दासगणू पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील तहसीलदारांसह नांदेड महापालिका यंत्रणेला खबरदारीचा इशारा दिला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचीन खल्लाळ यांनी सांगितले. शहरातील ऐतिहासिक श्री सचखंड गुरुद्वारात दिवाळीनिमित्त आज तख्तस्नान सोहळा होत आहे. हजारो भाविक घागरीने गोदावरी नदीपात्रातून पाणी नेऊन सेवा करीत आहेत. त्यामुळे नगीना घाट, बंदाघाट, नावघाट या भागात महापालिकेने जीवरक्षकांची नियुक्ती केली आहे.