नांदेड : बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी दिवसभर हा पाऊस सुरु होता. अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढल्याने नदी, ओढ्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक मार्गांवर पाणी असल्याने सुमारे ७२ गावांचा शहर, तालुक्याशी संपर्क तुटला आहे. विशेषता धर्माबाद, किनवट, हिमायतनगर, देगलूर या तालुक्यांमध्ये अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
किनवट तालुक्यातील दुधगाव, प्रधानसावंगी या गावांमध्ये काही घरे पाण्याखाली गेली आहेत तर अप्पारावपेठ ते गोंडजेवली, मलकाजम ते शिवणी, अप्पाराव पेठ ते मलकाजम, गोंडजेवली ते दयाळ धानोरा, शिवणी ते दयाळ धानोरा या रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प आहे. बेल्लोरी येथे अशोक पोशट्टी दोनेवार हे पुरात वाहून जात होते. त्यांना बचावकार्य करून वाचविण्यात आले.
मुखेड तालुक्यातील राजुरा बु. येथील प्रदीप साहेबराव बोयाळे (२५) हे पुरात वाहून गेले. त्यांचा मृतदेह सापडल्याचे प्रशासनाने सांगितले. इस्लापूर येथे हर्दुके हे पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना महसूलच्या पथकाने वाचविले. बनाळी येथे एका परिवाराला पुराच्या पाण्यातून वाहून जाताना पोलिसांनी जीवदान दिले. तर भोकर तालुक्यातील लगळूद येथे वाघू नदीच्या पुराने दिगंबर पिराजी कदम यांचे घर पुराच्या पाण्याने कोसळले. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.
नांदेड शहरात पाणी शिरल्याने अनेक कुटुंब उघड्यावरशहरातील विजयनगर, बाबानगर, वसंतनगर, अबचलनगर, देगलूर नका, रंगर गल्ली आदी भागातील शेकडो घरात पावसाचे पाणी शिरल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहे. मनपाने ड्रेनेज लाईन दुरुस्ती आणि नाल्यांची साफसफाई न केल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक केला.