फुले दाम्पत्याचे पुतळे प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:45 AM2019-01-04T00:45:08+5:302019-01-04T00:45:51+5:30
शहरात उभारण्यात आलेले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हे सामाजिक क्रांतीचे प्रतीक आहे. आजही क्रांतिकारी परिवर्तनाची गरज असून सामाजिक ऐक्याची देशाला गरज आहे.
नांदेड : शहरात उभारण्यात आलेले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हे सामाजिक क्रांतीचे प्रतीक आहे. आजही क्रांतिकारी परिवर्तनाची गरज असून सामाजिक ऐक्याची देशाला गरज आहे. फुले दाम्पत्याचे हे पुतळे प्रेरणादायी ठरणारे आहेत, असे प्रतिपादन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केले.
महापालिकेच्यावतीने शहरात महात्मा फुले चौकात उभारण्यात आलेल्या क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खा. अशोकराव चव्हाण अध्यक्षस्थानी होते. गहलोत म्हणाले, नांदेडला फुले दाम्पत्याच्या पुतळ्याचे अनावरण आपल्या हस्ते व्हावे, हा सुखद संयोग असल्याचे म्हणाले. राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचा भार स्वीकारल्यानंतर आपला हा पहिला सार्वजनिक कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे देशातील सामाजिक क्रांतीमध्ये मोठे योगदान आहे. महात्मा गांधीने त्यांच्यापासून प्रेरणा घेतली होती तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फुलेंना गुरू मानले होते. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांचे मोठे कार्य असल्याचे ते म्हणाले. आजही क्रांतिकारी परिवर्तनाची गरज आहे, असे गहलोत म्हणाले.
माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी शहरात फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे. आता आमचे लक्ष्य महात्मा बसवेश्वरांचा पुतळा असल्याचे सांगितले. त्याचवेळी शैक्षणिक क्षेत्रात नांदेड तसेच महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे शिक्षणासाठी जातात. त्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी मुख्यमंत्री गहलोत यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली.
आ. विक्रम काळे यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित पुतळे असलेले नांदेड हे एकमेव शहर असल्याचे सांगितले. परिवर्तनवादी विचारांच्या या दाम्पत्यांची प्रेरणा घेऊन राज्यातही परिवर्तन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अखिल भारतीय माळी संघाच्या वतीने राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सखाराम शितळे, साहेबराव सावंत आदींची उपस्थिती होती.
यावेळी विजय येवनकर यांचे समयोचित भाषण झाले. प्रास्ताविक महापालिका आयुक्त लहूराज माळी यांनी केले.
कार्यक्रमास काँग्रेस सरचिटणीस आ. संपतकुमार, आ. वसंतराव चव्हाण, आ. अमर राजूरकर, जि.प. अध्यक्षा शांताबाई पवार, महापौर शीला भवरे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, विरोधी पक्षनेता गुरप्रीतकौर सोडी, सभापती फारुख अली खान, उपमहापौर विनय गिरडे, सभागृहनेता वीरेंद्रसिंघ गाडीवाले, नागनाथ गड्डम, सभापती संगीता तुपेकर, कार्यकारी अभियंता गिरीश कदम, उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरहत उल्ला बेग, उपअभियंता दिलीप टाकळीकर आदींची उपस्थिती होती.
याच कार्यक्रमात शिल्पकार श्रेयस गर्गे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संतोष देवराय यांनी केले. आभार नगरसेवक दुष्यंत सोनाळे यांनी मानले.
- खा. अशोक चव्हाण यांनी अध्यक्षीय समारोपात काँग्रेस पक्षाने खऱ्या अर्थाने फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार स्वीकारल्याचे सांगितले. समाज सुधारण्याची भूमिका या समाजसुधारकांनी घेतली होती. आज काँग्रेसने ती भूमिका स्वीकारली असल्याचे सांगितले. महापालिकेने सर्व समावेशक अशी निमंत्रण पत्रिका काढली होती. मात्र ज्यांना सामाजिक परिवर्तनाचे विचार मान्य नाही ते आज मंचावर नसल्याचे सांगत सेना-भाजपावर टीका केली. सामाजिक समतेचा संदेश देणारे शहर म्हणून नांदेडची राज्यात ओळख झाली आहे. सत्तेच्या माध्यमातून सामाजिक एकोपा जोपासण्याचे काम नांदेडमध्ये होत असल्याचेही खा. चव्हाण म्हणाले.