नांदेड : लोकसभा निवडणुकीत प्रत्येक तालुकानिहाय प्रत्येक पक्षाची वेगळी ताकद आहे़ त्यामुळे अटीतटीच्या प्रसंगात काही तालुके हे निकाल फिरविणारे धक्कादायक निर्णय देवू शकतात़ परंतु, सध्यातरी तिन्ही उमेदवारांचे मुखेड, देगलूर या तालुक्यांवर विशेष लक्ष आहे़ त्यामुळे तिन्ही उमेदवार या तालुक्यांत अधिकची ताकद लावत आहेत़काँग्रेसचे उमेदवार खा़अशोकराव चव्हाण यांचा भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण यासह अर्धापूरमध्ये हक्काचा मतदार आहे़ मागील लोकसभा निवडणुकीत खा़चव्हाण यांना नांदेड उत्तर मतदारसंघातून ४३ हजार १५४, नांदेड दक्षिण-२७०९६ तर भोकर मतदारसंघातून २३ हजार १९९ मते अधिक मिळाली होती़ या तिन्ही मतदारसंघांनी अशोकरावांना जवळपास लाखभर मताधिक्य दिले होते़ त्यामुळे अशोकराव चव्हाण यांचे हे तीन मतदारसंघ स्ट्राँग पॉर्इंट आहेत़ या तिन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांचे मोठे जाळेही त्यांच्याकडे आहे़ तर महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांची भिस्त ही मुखेड, देगलूर अन् मुदखेडवर आहे़ मुखेड मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे़ या ठिकाणी भाजपाचे दिवंगत गोविंदराव राठोड व त्यानंतर डॉ़ तुषार राठोड यांना विधानसभेत चांगले मताधिक्य मिळाले होते़ या भागात भाजपाची चांगली ताकद आहे़ त्याचबरोबर देगलूर मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे़ त्यात आ़ सुभाष साबणे हे स्वत: चिखलीकरांच्या प्रचारात सक्रिय आहेत़काँग्रेस-भाजपासह वंचित बहुजन आघाडीच्या प्रा़ यशपाल भिंगे यांच्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे़ धनगर-हटकर समाजाचे प्राबल्य असलेल्या मुखेड, देगलूर, बिलोली या तालुक्यांवर भिंगे यांनी लक्ष केंद्रित केले आहे़ या पार्श्वभूमिवर प्रमुख तिनही पक्षांनी लक्ष केंद्रीत केले असून, जाहिर सभांबरोबरच गाठीभेटीवर उमेदवारांनी भर दिला आहे.उमेदवारांचे होल्ड असलेले हे आहेत प्रमुख विभाग, गाव
अशोकराव चव्हाण यांची नांदेड शहरावर चांगली पकड आहे़ त्याचबरोबर अर्धापूर, भोकर तालुक्यांत एकगठ्ठा मते अशोकरावांच्या पारड्यात पडत आली आहेत़ त्याचबरोबर मुखेडमध्ये मागील वेळी त्यांना ११ हजारांची लीड मिळाली होती़ तर देगलूर अन् नायगावमध्ये त्या तुलनेत कमी मताधिक्य मिळाले होते़प्रतापराव पाटील चिखलीकर हे मुखेड, देगलूर आणि मुदखेडवर अधिक अवलंबून आहेत़ नांदेड शहरात भाजपाची म्हणावी तेवढी ताकद नाही़ त्याचबरोबर जिल्ह्यात भाजपाचा केवळ एकच आमदार आहे़ त्यामुळे चिखलीकर हे शिवसेनेच्या आमदारांशी कसे जुळवून घेतात याकडेही लक्ष राहणार आहे़प्रा़ यशपाल भिंगे यांच्यासाठी मुखेड, देगलूर, बिलोली मतदारसंघात धनगर, हटकर या समाजाचे असलेले प्राबल्य प्लस पॉर्इंट आहे़ ग्रामीण भागातील दलित व मुस्लिम मतदारांची मने वळण्यिात त्यांना कितपत यश येईल, यावरही बरेच गणित अवलंबून आहे़
- २००९ निवडणुकीत काँग्रेसचे भास्करराव पाटील यांच्या विजयात देगलूरसह नांदेड दक्षिण, उत्तर मतदारसंघाने आघाडी दिली होती.
- २०१४ मोदी लाटेतही अशोक चव्हाण यांनी विजय मिळविला होता.या विजयात नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, भोकर आणि देगलूर या मतदारसंघात आघाडी मिळाली होती.