डॉ. शंकररावजी चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथे येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना कोरोनासारख्या गंभीर काळात जेवण मिळावे, यासाठी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी कै. श्रीमती मंजुळाबाई बापूराव पाटील खतगावकर यांच्या स्मरणार्थ अन्नछत्रालय चालवण्याचा निर्धार केला होता. ३ सप्टेंबर रोजी महंत दिनेशानंद गिरीजी महाराज व गुरुद्वारा लंगरसाहीबचे प्रमुख प.पू. संत बाबा बलविंदर सिंग यांच्या हस्ते या अन्नछत्रालयाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सोहळ्यास उत्तर प्रदेश चित्रकूट धाम येथील महंत दिनेशानंद गिरीजी महाराज, राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांचे शिष्य गुरू गोविंद गुरू, आ. राम पाटील रातोळीकर, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, मा.आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी महानगराध्यक्ष संतुकराव हंबर्डे, चैतन्यबापू देशमुख, संजय बियाणी, दिनेश बाहेती, माजी उपमहापौर स. सरजितसिंग गिल, दिलीपसिंग सोढी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
भुकेल्यांना जेवणाची सोय व्हावी, या हेतूने हे अन्नछत्रालय उभारण्याचा निर्णय घेऊन आज या संत मंडळींच्या हस्ते भूमिपूजन होत असल्याचा मनस्वी आनंद असल्याची भावना माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी आ. राम पाटील रातोळीकर, डॉ. माधवराव किन्हाळकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास बाळासाहेब पाटील खतगावकर, संतोष वर्मा, जनार्दन ठाकूर, ओमप्रकाश चालीकवार, शरद चालीकवार, डॉ. दागडीया, मनोज लोहिया, भास्कर पाटील भिलवंडे, रवी पाटील खतगावकर, दीपक पावडे, अतुल पाटील खतगावकर, जगन्नाथ चक्रवार, माणिक लोहगावे आदी उपस्थित होते.