चौकट
औषध दुकानांची तपासणीच होईना
नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांत जवळपास अडीच हजार औषध दुकाने आहेत. त्यांत होलसेल, रिटेलसह सर्वच प्रकारच्या औषध दुकानांचा समावेश आहे. त्यांची वर्षातून एकदा तपासणी होणे आवश्यक आहे; परंतु, एकच औषध निरीक्षक असल्याने तेही शक्य नाही. औषध निरीक्षकांच्या माध्यमातून फार्मासिस्ट, चिठ्ठीनुसार दिली जाणारी औषधी, लेखा-जोखा, खरेदी-विक्री, मुदतबाह्य औषधे, आदी बाबींची तपासणी करणे गरजेचे आहे. परंतु, कर्मचाऱ्यांअभावी औषध दुकानांची तपासणीच होत नाही.
हॉटेल्स व्यावसायिकही तपासणीपासून बिनधास्त
जिल्ह्यातील बहुतांश हॉटेल्स ही अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी न घेताच सुरू केलेले आहेत. त्यात ज्यांनी नोंदणी केली, त्यांना केवळ कार्यालयाकडून ग्रीन सिग्नल दिला जातो. परंतु, प्रत्यक्षात हॉटेल्सची तपासणी होत नसल्याने हॉटेल व्यावसायिकही बिनधास्त राहत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील हॉटेल्स, टपरीचालक, पाणीपुरी विक्रेते, आदींची नोंदणी करण्याची मोहीम अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने काही दिवसांपूर्वी राबविली होती.
कोर्टकचेऱ्या करण्यातच अधिकाऱ्यांचा जातो वेळ
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने केलेल्या कारवाईसंदर्भात विभागाचे म्हणणे न्यायालयासमाेर मांडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना हजर राहावे लागते. त्यामुळे बहुतांश अधिकारी-कर्मचाऱ्यांचा निम्मा वेळ हा न्यायालयीन कामकाजातच जातो. त्यात नांदेडमध्ये असणारे १६ तालुके आणि नांदेडपासून इतर तालुक्यांचे असलेले अंतर पाहता अधिकारी-कर्मचारी यांना काम करण्याचे सूत्रच जुळत नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी नियमबाह्यरीत्या हॉटेल्स सुरू असल्याचे आढळून येते.
कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने प्रत्येक दुकानाची तपासणी करणे शक्य होत नाही; परंतु, आमच्या पद्धतीने शक्य तेवढ्या जास्तीत जास्त दुकानांचे वार्षिक ऑडिट तपासले जाते. जास्तीत जास्त दुकानांना भेटी देऊन त्यांचा लेखाजोखा तपासला जातो. तसेच ग्राहकांनी तक्रारी केल्यास संबंधितांच्या प्रतिष्ठानाची तपासणी करून योग्य ती कार्यवाहीही केली जाते.
- माधव निमसे, औषध निरीक्षक, नांदेड