नायगाव मतदारसंघात पहिल्यांदाच काँग्रेसकडून महिला उमेदवारांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 06:02 PM2024-10-26T18:02:21+5:302024-10-26T18:02:59+5:30
तीन टर्ममध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघ झाल्यापासून एकही महिला उमेदवाराने निवडणूक लढविली नाही.
धर्माबाद ( लक्ष्मण तुरेराव) : नायगाव विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये अंमलात आला. तेव्हापासून एकही महिला उमेदवारांना संधी कोणत्याही पक्षाकडून देण्यात आली नाही. आता २०२४ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मिनल खतगावकर यांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.
नायगाव विधानसभा मतदारसंघात नायगाव, धर्माबाद व उमरी या तीन तालुक्यांचा समावेश आहे. २००९ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवार वसंतराव चव्हाण विरुद्ध राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरठेकर यांच्यात लढत झाली होती. वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला होता. तिसऱ्या क्रमांकावर जनसुराज्य शक्तीचे बालाजी बच्चेवार हे होते. २०१४ मध्ये काँग्रेसकडून पुन्हा वसंतराव चव्हाण यांना संधी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात भाजपकडून राजेश पवार हे उमेदवार होते. तर अपक्ष म्हणून बापूसाहेब गोरठेकर हे उमेदवार होते. यात दुसऱ्यांदा वसंतराव चव्हाण विजयी झाले होते. भाजपचे राजेश पवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते. तर बापूसाहेब गोरठेकर तिसऱ्या क्रमांकावर होते.
२०१९ मध्ये काँग्रेसकडून पुन्हा वसंतराव चव्हाण यांना संधी दिली. त्यांच्या विरोधात भाजप-रिपाइंकडून राजेश पवार यांच्यात लढत झाली. यावेळेस राजेश पवार यांचा विजय झाला. वंचितकडून मारोतराव कवळे यांनी निवडणूक लढविली ते तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यावेळी बापूसाहेब गोरठेकर यांनी भाजपात प्रवेश करून भोकर विधानसभा मतदारसंघात अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती.
तीन टर्ममध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघ झाल्यापासून एकही महिला उमेदवाराने निवडणूक लढविली नाही. कोणत्याही पक्षाने संधी दिली नाही. २०२४ मध्ये पहिल्यांदाच काँग्रेसकडून मिनल खतगावकर यांना संधी मिळाली आहे. २०२४ मध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघात रणधुमाळी सुरू झाली आहे.महायुतीकडून विद्यमान आमदार राजेश पवार यांना भाजपचे तिकीट मिळाले. तर काँग्रेसकडून मिनल खतगावकर यांना तिकीट मिळाले आहे. वंचितकडून डॉ. माधव विभुते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून तिरंगी लढतीचे चित्र दिसत आहे.