नंदुरबार : सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी जिल्ह्यात बालविवाह रोखला. बालआमराई येथील १७ वर्षीय युवती व १९ वर्षीय युवकाचा बालविवाह होणार होता. अक्षता समितीने युवती व युवकाच्या पालकांचे समुपदेशन करून त्यांचे मन वळविले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच वालंबा, ता. अक्कलकुवा येथेही बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आले होते.
३० मार्च रोजी वालंबा-काठी येथील अल्पवयीन मुलीचा बालविवाह थांबवून त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणाऱ्या पथकाचा पोलिस अधीक्षक कार्यालयात पी. आर. पाटील यांच्या हस्ते सत्कार सुरू होता. त्याचवेळी चाइल्ड लाइन, नंदुरबार या संस्थेमार्फत माहिती मिळाली की, बालआमराई येथील एका अल्पवयीन मुलीचा त्याच गावातील एका मुलासोबत ३१ मार्च रोजी बालविवाह होणार आहे. गांभीर्य लक्षात घेऊन अक्षता सेल तातडीने बालआमराई येथे पोहोचले. गावात एका ठिकाणी साखरपुडा कार्यक्रम असल्याचे दिसून आले. मुलाच्या व मुलीच्या नातेवाइकांना त्यांच्या जन्म तारखेबाबत विचारपूस करून आधार कार्डची मागणी केली. आधार कार्डची पाहणी केल्यानंतर युवती १७ वर्षे व मुलाचे वय १९ वर्षे १० महिने असल्याचे स्पष्ट झाले. पथकाने बालविवाहाचे शारीरिक, सामाजिक दुष्परिणामांबाबत माहिती दिली. कायदेशीर कारवाईचीही माहिती दिली व समुपदेशन केले. मुलीच्या व मुलाच्या पालकांना कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे.