नांदेड : शहरातील नाथनगर येथे नागेश घोटाळे याच्या निवासस्थानी गोवा निर्मित विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे़ घरात आणि चारचाकी वाहनात हा साठा जप्त करण्यात आला आहे़ यासह जिल्ह्यातील सहा धाब्यावरही छापे टाकण्यात आले असून १३ लाख १८ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता अंमलबजावणीसाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत़ उत्पादन शुल्क विभागानेही पाच पथके तयार केली आहेत़ यातील एका पथकाला नाथनगर येथे नागेश शंकरराव घोटाळे याच्या राहत्या घरी गोवा निर्मित एम्पेरियल ब्ल्यू, मॅकडॉवेल नंबर १ या विदेशी मद्याचा साठा घरात सापडला़ तसेच त्याच्या चारचाकी वाहनातही हा मद्यसाठा सापडला़ नागेश घोटाळे याची चौकशी केली असता सदरचा साठा त्याने नांदेड-लातूर रस्त्यावरील हॉटेल गुरुकृपा धाबा, पार्डी शिवारातील हॉटेल दोस्ती बॉर्डर धाबा, खांबेगाव, हॉटेल स्वरांजली व जगदंबा माळाकोळी आणि राहेर ता़नायगाव येथील हॉटेल अजिंक्य येथे हा साठा दिल्याची माहिती त्याने दिली़ त्याने दिलेल्या माहितीवरून उपरोक्त सर्व धाब्यावर छापे मारण्यात आले़ या सर्व छाप्यामध्ये १३ लाख १८ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई उघडकीस आणण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे किनवट निरीक्षक एस़एम़ बोदमवाड, बिलोलीचे निरीीक्षक एस़एसख़ंडेराय, नांदेडचे निरीक्षक डी़एऩ चिलवंतकर, दुय्यम निरीक्षक बी़एस़मंडलवार, वाय़एस़लोळे, शेख ताहेर, एक़े़ शिंदे, व्ही़बी़मोहाळे, आऱजी़ सूर्यवंशी, ए़बी़जाधव, एल़बी़ माटेकर, आशालता कदम, केक़े़ किरतवाड, मोहमद रफी, व्ही़टी़ खिल्लारे, के़आऱ वाघमारे, बालाजी पवार, अब्बास पटेल, विकास नागमवाड, रावसाहेब बोदमवाड, दिलीप जाधव आदींचा सहभाग होता़ पुढील तपास एस़एम़ बोदमवाड व एस़एस़ खंडेराय करीत आहेत़