किनवट ( नांदेड ) : नांदेडवनविभाग, किनवट महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या साडेतीनशे ते चारशे अधिकारी- कर्मचार्यांनी १ फेब्रुवारी रोजी सकाळी चिखली बु. ता. किनवट येथे छापा टाकून सागवानाचे कटसाईज लाकडे, वेगवेगळे फर्निचर असा ५० लाखांचा २८ ट्रॅक्टर, एक आयशर टेम्पो एवढा माल जप्त केला. ‘आॅपरेशन ब्लूमून’ नावाने ही कारवाई करण्यात आली. तत्पूर्वी ड्रोन कॅमेर्याच्या सहाय्याने संपूर्ण गावचं कॅमेराबंद करण्यात आले होते.
चिखली ( बु़ ) सागवान तस्करीसाठी कुप्रसिद्ध आहे़ जंगलातून लाकूड तोड करून त्याचे फर्निचर बनविण्यासाठी कटसाईज लाकडे घरात साठवून ठेवण्यात येते, याची खात्रीशीर माहिती वनविभागाने मिळविली. मागील तीन महिन्यांपासून कारवाई करण्याची तयारी वनखात्याने करुन १ फेब्रुवारी रोजी त्याचा मुहूर्त साधला. त्यानुसार नांदेडचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, सहाय्यक वनसंरक्षक डॉ़ राजेंद्र नाळे, डी़एस़ पवार, तहसीलदार नरेंद्र देशमुख, नांदेडचे पोलिस निरीक्षक राजेंद्र शहाने, किनवटचे विकास पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील १६ वनपरीक्षेत्राधिकारी वनपाल, वनरक्षक, वनमजूर अशा २५० जणांनी नांदेडच्या शंभरहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचार्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
धाडसत्रासाठी ३१ जानेवारी रोजी वनविभाग, महसूल व पोलिसांनी पूर्वतयारी करून १ फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा सहा वाजता गाव ड्रोन कॅमेरा बंद करून कारवाई सुरू केली़ साडेअकरापर्यंत ही कारवाई चालली़ या छाप्यात ५० लाख रुपयांच्या वर किंमतीचे सागवानचे कटसाईज लाकूड व फर्निचर घरातून काढले़ सर्व माल जमा केल्यानंतर २८ ट्रॅक्टर व एक आयचर टेम्पो एवढा माल निघाला़ जप्त केलेला माल राजगड वन आगार येथे नेण्यात येवून त्याची मोजदाद सुरू असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक डॉ़राजेंद्र नाळे यांनी सांगितले़ सद्यघ डीला कोणाहीविरूद्ध कारवाई करण्यात आली नाही. १० लाकूड कापणार्या मशीनही जप्त केला़
तब्बल २० वर्षानंतर कारवाई२० वर्षापूर्वी म्हणजे १९९८-९९ ला तत्कालीन उपवनसंरक्षक एमक़े़ राव व तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक व्ही़व्ही़ लक्ष्मीनारायण यांच्या कार्यकाळात चिखली बु़ गावात अशीच धाड टाकून अडीच ट्रक सागवान माल वनविभाग व पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून जप्त केला होता़
अवैध सागवानासाठी चिखली कुप्रसिद्धअवैधरित्या सागवानाची तोड, त्याची तस्करी यासाठी चिखली बु. प्रसिद्ध आहे. लाकूड तस्करीला आळा घालण्यासाठी गेलेल्या वन, पोलिसांच्या पथकावरही गावात हल्ले करण्यात आले. याशिवाय तावडीतील वाहन, लाकडे पळविण्याच्याही घटना चिखलीत घडल्या. चिखलीतील धाडीनंतर वनविभागाने किनटमधील फर्निचर मार्टवर कारवाई करणे गरजेचे आहे. यातूनही वनविभागाला मोठे घबाड मिळेल. यापूर्वी डॉ. राजेंद्र नाळे यांनी अशी कारवाई केली होती.