नांदेड : नांदेड शहर व परिसरात कोरोना संसर्गाचा हाहाकार सुरू झाला असून रुग्णमृत्युचे प्रमाणही वाढत आहे. एका दिवसात तब्बल २४ जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील केवळ पाच जणांचीही तपासणी केली जात नाही. त्यामुळेच संसर्ग वाढून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे.
नांदेड जिल्ह्यात अचानक हजारांवर रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे प्रशासनाने ठिकठिकाणी चाचणी करण्यासाठी कोरोना तपासणी केंद्रे उभारली आहेत. शहरात जवळपास १५ ठिकाणी कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यातून होणाऱ्या तपासण्यात दररोज एक हजार ते दीड हजार रुग्ण पाॅझिटिव्ह येत आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील किमान पाच जणांची तरी तपासणी होणे गरजेचे आहे. परंतु, आरोग्य विभागाला कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचाच विसर पडल्याचे दिसत आहे. त्यात गृहविलगीकरणाची मुभा रद्द केल्याने कोणीही संशयित तपासणीसाठी पुढे यायला तयार नाही. त्याचबरोबर मेडिकलवर जाऊन सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीच्या गोळ्या-औषधी घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बहुतांश मेडिकलवर नेहमीपेक्षा आजघडीला गर्दी अधिक पहायला मिळत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केली नाही तर रुग्णसंख्या आणखी झपाट्याने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दररोज हजार पॉझिटिव्ह; चाचण्या मात्र साडेचार हजारांच्याच
नांदेड शहर तसेच जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव वाढला आहे. त्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याने कोरोना रूग्ण वाढत आहेत. घरात कोणी पॉझिटिव्ह आले तरी घरातील इतर सदस्य कोरोना तपासणी करण्याऐवजी मेडिकलवर जाऊन सर्दी, ताप, खोकल्यासह व्हिटॅमिनच्या गोळ्या घेण्यावर भर देत आहेत. त्याचबरोबर इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करून घरीच उपचार करीत आहेत. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून बाधित रूग्णांचा परिसर प्रतिबंधित करणे गरजेचे आहे. अन्यथा दिवसेंदिवस हा आकडा वाढतच जाईल. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून तपासण्या केल्या तर निश्चित काही दिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होईल. परंतु, भविष्यातील धोका टळेल.
पॉझिटिव्ह रुग्ण बिनधास्त
कोरोना चाचण्या करूनही अनेकजण पॉझिटिव्ह असतानाही बिनधास्त आहेत. अनेकांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारलेले नाहीत. त्याचबरोबर पॉझिटिव्ह असूनही मला काहीच लक्षणे नाहीत, असे सांगत काही जण मॉर्निंग वाॅक, व्यायामासाठी घराबाहेर पडत आहेत. तसेच बाजारपेठेतही भाजीपाला अथवा इतर साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे आढळून येत आहे.
कोरोना तपासणी केल्यानंतर रुग्ण पॉझिटिव्ह आला तर त्यास लगेचच विलगीकरण कक्षात घेतले जात नाही. रुग्णालयात भरती होण्यासाठी रुग्णांनाच शासकीय रुग्णालय, आयुर्वेद रुग्णालय, पंजाब भवन यासह खासगी रुग्णालयाच्या दारोदारी भटकावे लागत आहे. शासकीय रुग्णालयातून कौठा रुग्णालयात पाठविण्यात आलेल्या रुग्णांना भरती करून घेण्याऐवजी बाहेरच उभे केले. हा प्रकार किती गंभीर आहे, हे संबंधित अधिकाऱ्याला लक्षात आले नसावे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.