'फोटोजीवी' कार्यकर्त्याच्या स्टेजवर उचापती, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी दाखवली जागा
By सुमेध उघडे | Published: November 4, 2022 06:05 PM2022-11-04T18:05:10+5:302022-11-04T18:05:32+5:30
माजी मुख्यमंत्री आ. अशोल चव्हाण यांचे भाषण सुरु होताच पांढरे कपडे घातलेला एक कार्यकर्ता हळूच स्टेजवर आला.
नांदेड : माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमातील एका 'व्हायरल व्हिडीओ'ची खमंग चर्चा सध्या सुरू आहे. चमकोगिरी करत उचापती करणाऱ्या कार्यकर्त्यास आ. चव्हाण यांनी स्टेजवरच झिडकारल्याचे व्हिडिओमध्ये पाहावयास मिळत आहे. केवळ फोटोसाठी काही कार्यकर्ते कोणत्या स्तराला जातील याचा काही नेम नाही अशीच चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एकहाती कॉंग्रेसचे वर्चस्व टिकवून ठेवले आहे. मागे झालेल्या देगलूर पोटनिवडणुकीत कॉंग्रसच्या उमेदवारास निवडून आणत त्यांनी जिल्ह्यात वर्चस्व सिद्ध केले होते. दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सध्या भारत जोडो यात्रेच्या नियोजनात व्यस्त आहेत. यातच आ. चव्हाण यांचा २८ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस होता. यानिमित्त मुदखेड येथे आयोजित एका कार्यक्रमात आ. चव्हाण यांनी हजेरी लावली होती.
नांदेड: एका 'फोटोजीवी' कार्यकर्त्यास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी स्टेजवरच झिडकारले; जागा दाखवत केले बाजूला, व्हिडीओ व्हायरल#ashokchavanpic.twitter.com/xmOAHnCVNC
— Lokmat (@lokmat) November 4, 2022
यावेळी स्वागताला उत्तर देण्यासाठी आ. चव्हाण बोलण्यास उठले. त्यांनी भाषण सुरु केले याचवेळी पांढरे कपडे घातलेला एक कार्यकर्ता हळूच स्टेजवर आला. हळूच तो आ. चव्हाण यांच्या मागे जाऊन उभा राहिला. हे लक्षात येताच आ. चव्हाण यांनी त्याला बाजूला होण्यास सांगितले. तर तो कार्यकर्ता थोडेस बाजूला झाला. तेव्हा पुन्हा आ. चव्हाण यांनी पाहताच एक निवेदन देण्याचा प्रयत्न करू लागला. भर कार्यक्रमात भाषण सुरु असताना नसती उठाठेव करणाऱ्या या कार्यकर्त्यास मात्र यानंतर आ. चव्हाण यांनी झिडकारत तेथून बाजूला होण्याचा इशारा केला. आगंतुकपणा करणारा हा कार्यकर्ता काही झालेच नाही या आविर्भावात तेथून बाजूला झाला. मात्र, या सर्व प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भविष्यातही 'फोटोजीवी' कार्यकर्त्यांना बाजूला सारून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आ. चव्हाण न्याय देतील अशी चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे.