यातील तक्रारदार माजी नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, माजी नगरसेवक केशव रामा मुद्देवाड यांना माझी जात माहीत आहे, तसेच मी व माझ्या पत्नीने शहरातील आमच्या मालकी जागेवर नगरपरिषदेची रितसर परवानगी घेऊन बांधकाम केल्याचेही माहीत आहे. मात्र, तरीही माझी राजकीय व सामाजिक बदनामी करून अपमान करण्याच्या उद्देशाने पालिका प्रशासन, महसूल प्रशासन यांच्याकडे अर्ज करून ३ फेब्रुवारीपासून भोकर उपविभागीय कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले. उपोषणापूर्वी पालिकेचे मुख्याधिकारी यांनी सदरील बांधकाम पालिकेची परवानगी घेऊन करण्यात आल्याचे नोटिसीद्वारे कळवून उपोषण माघारी घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले होते, तरीही माझ्या मालकीच्या वापराच्या जागेत अडथळा निर्माण करण्यासाठी, तसेच मला व माझ्या परिवाराला त्रास देण्यासाठी आरोपीने बॅनर तयार करून सार्वजनिक ठिकाणी माझ्यासह पत्नीची बदनामी करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली. या प्रकरणात मानहानी झाल्याची कायदेशीर नोटीस दिल्यानंतही उपोषण सुरू ठेवले. यामुळे माझ्या परिवारात भीती निर्माण झाली. या तक्रारीवरून माजी नगरसेवक केशव रामा मुद्देवाड यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर अधिक तपास करीत आहेत.
माजी नगरसेवकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:17 AM