नांदेड : शहरातील अर्सजन भागात एका ट्रक चालकाला बंदुकीचा धाक दाखवून पावणेतीन लाख रुपयांची बॅग लंपास करण्यात आली होती. या प्रकरणात काही तासांतच स्थानिक गुन्हे शाखेने चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून राेख २ लाख ६० हजार रुपये, चोरीतील दुचाकी, बनावट बंदूक असा २ लाख ६६ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
लातूर येथील लहू भंडगे हे ट्रकमध्ये (क्रमांक एम. एच. ०९, ईएम १७५५) दूध भरून पद्मजा सिटीसमोरून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचा ट्रक अडविला. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून भंडगे यांच्याजवळील २ लाख ७० हजार रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली. घटनेनंतर नांदेडात खळबळ उडाली होती. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यानंतर स्थागुशाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, पोलीस उपनिरीक्षक बोराटे यांच्या पथकाने बलप्रीतसिंग सपुरे, प्रतापसिंघ शिरपल्लीवाले, हरपालसिंग बोरगाववाले आणि राेहितसिंग सहानी या चार जणांना पकडले. आरोपींना पुढील तपासासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ती बंदूक होती बनावटआरोपींनी ट्रक चालकाला बंदुकीचा धाक दाखवून लुबाडले होते. पोलिसांनी पकडल्यानंतर आरोपीकडे असलेली बंदूक ही बनावट असल्याचे पुढे आले आहे. खेळण्यातील बंदुकीद्वारेही आरोपी लुटमार करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.