नांदेड : रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार केला जात असल्याच्या तक्रारी मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडून केल्या जात होत्या. अखेर बुधवारी शहरातील शिवाजीनगर भागातील डॉक्टर लाईन परिसरात चढ्या दराने रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळ्या बाजाराला काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिवीर इंजेक्शन गरजूंना उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी औषध प्रशासनाची पथकेही स्थापन करण्यात आली आहेत. मात्र, त्यानंतरही रेमडेसिवीर संबंधीच्या तक्रारी कमी झालेल्या नाहीत. बुधवारी शहरातील हनुमान पेठ भागातील गौतम नरसिंगदास जैन यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. रेमडेसिवीर १०० एमजी हे इंजेक्शन मूळ किमतीपेक्षा अधिकची रक्कम घेऊन विकले जात असल्याचे त्यांनी या तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. डी. भारती, गंगाधर कदम, बालाजी तेलंग, गणेश धुमाळ यांच्यासह अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने या इंजेक्शनचा काळाबाजार करणारे वीरभद्र संगप्पा स्वामी (वय २६, रा. शिरुर, ता. अहमदपूर, हं. मु. गोकुळ नगर, नांदेड), बाबाराव दिगाकंद पडोळे (वय २५, हिंदुस्थान मेडिकल वाजेगाव, हं. मु. विष्णू नगर, नांदेड), बालाजी भानुदास धोंडे (वय ३४, रा. शिवडी, ता. लोहा, हं. मु. श्रीपाद नगर, कौठा) आणि विश्वजीत दिगंबर कांबळे उर्फ बारडकर (वय ३६, रा. बारड, ता. मुदखेड) या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३६ हजार ४०० रुपये मूळ किंमत असलेली ७ रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आली. प्रशासनाच्या या कारवाईमुळे रेमडेसिवीरच्या काळा बाजाराला काहीसा आळा बसण्याची शक्यता असून, प्रशासनाने ही कारवाईची मोहीम पुढील काही दिवस कायम ठेवण्याची मागणी होत आहे.
रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे चौघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:18 AM