- श्रीनिवास भोसले
नांदेड : मागील चार दिवसांपासून अधून मधून सुरू असलेल्या पावसाने नदी-नाल्याना पाणी आले आहे. सोमवारी झालेल्या पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला असून ओढ्याला आलेल्या पुराने दोन वेगवेगळ्या घटनेत चौघांचा बळी घेतला तर वाहून गेलेले अन्य दोघांचा शोध घेतला जात आहे.
सोमवारी रात्री वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये नांदेड जिल्ह्यात ४ जण वाहून गेले होते. या चौघांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. मावंद्याच्या जेवणासाठी बहिणीच्या घरी आलेला भाऊ, भाऊजयी आणि त्यांची मुलगी यांचा मृतांमध्ये समावेश आहे. बहिनीकडून जेवण करून परतताना नायगाव तालुक्यातील मांजरम-कोलंबी दरम्यान असलेल्या पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची जिप ओढ्यात गेली. गाडीतून बाहेर पडण्याची संधी न मिळाल्याने त्यांचा गाडीतच मृ़त्यू झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत बेंद्री गावाजवळ नाल्यावरून जात असताना एक तरुण वाहून गेला होता. या तरुणाचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
अनेक गावांचा संपर्क तुटलासोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, तर काही गावातील पुलावरील पाणी हळू हळू कमी होत असल्याने परिस्थिती पुर्ववत होत आहे. दरम्यान, नांदेड तालुक्यातील पिंपळगांव(नि), बामणी, भानगी, वाहेगव, बेटसंगवी, गंगाबेट यासह शेलगाव आदी गावाचा संपर्क तुटला आहे. गावानजीक असलेल्या पुलावर पाणी असल्याने विद्यार्थ्यांना, नोकरदारांना गावाबाहेर पडता आले नाही तर बाहेरून गावात येणारे जिल्हा परिषद शिक्षक देखील पूर ओसरण्याची वाट पाहत आहेत.