नांदेड: गुरुवारी सायंकाळी नायगाव तालुक्यातील मरवाळी आणि हदगाव तालुक्यातील वायपना बु. येथे तसेच किनवट तालुक्यातील शिवणी येथे आणि हिमायतनगरात तालुक्यातील वारंग टाकळी येथे वीज अंगावर पडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चार घटनांत सातजण जखमी झाले आहेत.
नायगाव तालुक्यातील मरवाळी येथे रामकिशन शंकर चिखले (वय ७०) यांचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. ते नेहमीप्रमाणे गुरुवारी शेतावर गेले होते, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वारा सुटला आणि काही वेळातच विजेच्या कडकडासह पावसाला सुरुवात झाल्याने चिखले आडोशाला म्हणून शेतातीलच लिंबाच्या झाडाखाली थांबले होते, त्याचक्षणी अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले. घटनास्थळी मंडळाधिकारी बी.एच.फुपाटे, तलाठी एस.के.मुंढे यांनी भेट देवून पंचनामा केला.दरम्यान, गडगा व परीसरात गुरुवारी सांयकाळी वादळी वारा व वीजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. वीजपुरवठा खंडित झाला.
हदगाव तालुक्यातील वायफना बु. येथील जिजाबाई रामदास गव्हाणे (वय $४२) यांचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. मयत जिजाबाई, त्यांच्यासोबत सुभद्रा गणेश नरवाडे (वय ६०), इंदिरा अशोक धनगरे (वय ४५), लक्ष्मी संदीप धनगरे (वय २५), अनिता विलास नरवडे (वय ३०) आदी सर्वजण रामदास मुधळे यांच्या शेतात काम करीत असताना सायंकाळी ४.३० च्या दरम्यान विजा चमकून पाऊस सुरुझाला. यात जिजाबाई यांच्या अंगावर वीज पडली. त्यांना लगेच वायफना येथील प्रा.आ. केंद्रात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. यातील इंदिराबाई धनगरे, लक्ष्मी संदीप धनगरे ह्या दोघी यात जखमी झाल्या असून, त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी येथे कपील आनंदराव कदम (वय २७), अक्षय अवधूत कदम (वय २०), सुनील आनंदराव कदम (वय ३०), आनंदराव संतूराम कदम (वय ५२) हे गुरुवारी सायंकाळी शेतात काम करीत असताना अचानक वीज कोसळली. यात चौघेही जखमी होवून यातील कपील कदम यांचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, किनवट तालुक्यातील शिवणी येथेही वीज अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. किशन राघोजी भिसे (व ४५ रा. शिवणी) असे मयताचे नाव असून, जखमींत लक्ष्मण रामराव देशमुखे (व ३० रा. शिवणी), राजू नागोराव भिसे (वय ३२ रा. शिवणी) असे जखमींचे नाव आहेत. जखमींना शिवणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. शेतातील काम आटोपून परताताना ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.