नांदेड येथील वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ कार्यालय व इमारतीच्या उद्घाटन समारंभात शनिवारी ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिरडे, अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ संजय गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
नांदेड विभागातील मंजूर केलेल्या विविध विकासकामांबाबत प्रशासकीय सेवासुविधा व इतर अत्यावश्यक कार्यालये इथेच असणे आवश्यक होते. नांदेड विभागातील मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेल्या विकासकामांना प्रशासकीय कामांसाठी नांदेड येथे कार्यालय नसल्यामुळे औरंगाबाद, उस्मानाबाद येथे सातत्याने जावे लागायचे. यासाठी वेळेचा अपव्यय होणे व परिणामी जी कामे हाती घेतली आहेत त्या कामांच्या पूर्ततेला विलंब लागणे असे चक्र सुरू होते. नागरिकांच्या सेवासुविधांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यादृष्टीने विचार करून नांदेड येथे प्रशासकीय सोयीसाठी वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ पद स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतला. शनिवारी हे कार्यालय स्वतंत्र इमारतीत सुरू होत असल्याबद्दल मला आनंद होत असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. या कार्यालयात आता एक वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, एक वास्तुशास्त्रज्ञ, एक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, एक सहायक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ ही चार पदे निर्माण करून त्याला मान्यता दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील पूल व इमारती यांच्या संकल्पनसाठी स्वतंत्र विभाग आहे. हे कार्यालय सद्य:स्थितीत मुंबईमध्ये आहे. यासंदर्भातील पूल व इमारत यांचे संकल्पनबाबतची हायब्रीड अन्युईटी, एडीबी इतर आनुषंगिक कामे नांदेड येथेच मार्गी लागावीत यादृष्टीनेही संकल्पचित्र विभाग पूल आणि इमारती हे कार्यालय नांदेड येथे सुरू करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाच्या दृष्टीने सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्याचे ते म्हणाले.
शासनाच्या उपलब्ध असलेल्या निधीतून विविध विकास योजना व्हाव्यात ही नागरिकांची मागणी असते. या मागणीसमवेत जो काही निधी आपल्या विभागाला मिळालेला आहे त्या निधीतील प्रत्येक कामे ही गुणवत्तापूर्ण व कल्पक असली पाहिजेत. यासाठी व्हिजिलन्स व क्वालिटी सर्कल विभागाने दक्षता घेऊन यात तडजोड चालणार नाही याची काळजी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. मोठ्या कष्टाने आपण इमारती निर्माण करतो, त्या इमारतीतील स्वच्छता आणि निगा तेवढीच महत्त्वाची आहे. चांगल्या कामासाठी कंत्राटदारही चांगले असले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नांदेड विभागात शासकीय क्वार्टरसह अनेक इमारती या जुन्या झालेल्या आहेत. मोडकळीस आलेल्या आहेत. काही इमारती या १९६८ पासून आहेत. त्यांच्या मेंटेनन्सवर होणाऱ्या खर्चामध्ये संपूर्ण सार्वजनिक विभागाचे एकत्र संकुल होऊ शकेल. याबाबत आढावा घेऊन नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ अजय मोरे, अधीक्षक अभियंता विद्युत अ.बा. चौघुले, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता संजय साहुत्रे, कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी गत वर्षभरात युद्धपातळीवर पूर्णत्वास नेलेल्या विविध योजनांची माहिती दिली.