नांदेड : शेतकऱ्यांना शेतीला पाणी देताना कमी दाबाने वीजपुरवठा झाल्याने कृषीपंप चालण्यास अडचणी येतात. शेतकऱ्यांना पिकासाठी वेळेवर पाणी उपलब्ध व्हावे, त्यात तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी महावितरणकडून कृषीपंपासाठी स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात स्वतंत्र डीपी बसविलेल्या चार हजार शेतकऱ्यांना स्मार्ट मीटर बसवून देण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
ग्रामीण भागात अनेकवेळा वीज गुल होत असल्याने आणि दिवसा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने कृषीपंप चालण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे वेळेवर ओलित करणे शक्य नसल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकरी वर्गाला सोसावा लागतो. ज्या शेतकऱ्याने स्वतंत्र डीपीची मागणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या धोरणानुसार मागेल त्या शेतकऱ्याला स्वतंत्र डीपी द्यावा, असा निर्णय उद्धव ठाकरे सरकारच्या काळात घेण्यात आला होता. पण, सर्व शेतकऱ्यांना स्वतंत्र डीपी देणे शक्य नसल्याचे म्हणत सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने स्वतंत्र डीपीसाठी काही नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसार ज्या शेतकऱ्याच्या शेतापासून २०० मीटर अंतरावरून वीजतारा गेलेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांनी आहे त्या डीपीवरून कृषीपंप सुरू ठेवायचा आहे. तर २०० ते ६०० मीटर अंतर असलेल्या शेतकऱ्यांनी स्वतंत्र डीपीची मागणी केल्यास त्यांना बसवून देण्यात येत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतापासून ६०० मीटरपेक्षा जास्त दुरून तारा गेलेल्या असतील, अशा शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्प बसवून देण्यात येत आहे.
नांदेड जिल्ह्यात एकही प्रिपेड मीटर बसविले नाहीप्रिपेड मीटर बसविण्यापूर्वी स्मार्ट मीटरची एक स्टेप असून, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर प्रिपेड मीटर दिले जाते. परंतु, या मीटरलाच प्रिपेड मीटरमध्ये कन्व्हर्ट करण्याची व्यवस्था आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकाही ग्राहकाला प्रिपेड मीटर बसविण्यात आलेले नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.