राष्ट्रीय लघुपट निर्मिती स्पर्धा
नांदेड, ग्रामीण भागात शौचालयाच्या नियमित वापराबरोबर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने स्वच्छता लघुपटांचा अमृतमहोत्सव या लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन केले आहे स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
या स्पर्धेत दोन वेगवेगळ्या भागातील विषयात लघुपटाची निर्मिती करून स्पर्धकाने आपली वैध व सक्रिय ई-मेल आयडीसह संबंधित संकेतस्थळावर २० जुलैपर्यंत हा लघुपट युट्युबवर अपलोड करावा. यात प्रथम पारितोषिक १ लाख ६० हजार रुपये, व्दितीय ६० हजार रुपये, तर तृतीय पारितोषिक ३० हजार रुपये असे असणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी सर्व स्पर्धकांनी संकेतस्थळावरील नियम व अटींसाठी संबंधित संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दूरशिक्षण विभागाच्या संचालकपदी डॉ. रमजान मुलानी
नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाच्या संचालकपदी डॉ. रमजान मुलानी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच शिक्षणशास्त्र संकुलाचे संचालक तथा दूरशिक्षण विभागाचे प्रभारी संचालक डॉ. चंद्रकांत बावीस्कर यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. नियुक्तीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. डी. एम. खंदारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र-संचालक डॉ. रवी सरोदे आदींनी स्वागत केले आहे.
विद्यापीठाच्यावतीने सचिन सरोदे यांचे व्याख्यान
नांदेड,. कोरोना महामारीविषयी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पालक आणि नागरिकांना वैज्ञानिकदृष्ट्या योग्य माहिती मिळावी. या हेतूने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजिली आहे. कोरोना महामारीचे अभ्यासक डॉ. सचिन सरोदे हे १० जुलै सायंकाळी ६ ते ८ दरम्यान ‘युट्यूब लाईव्ह’ या माध्यमाद्वारे या व्याख्यान देणार आहेत. सर्वांना खुल्या आसलेल्या या व्याख्यानमालेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी दिली.