नांदेड : राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असून, अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे शासनानेही आता कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता १ मार्चपासून शासकीय आणि खासगी रुग्णालयात ही लस दिली जाणार आहे. शासकीय रुग्णालयात नि:शुल्क तर खासगी रुग्णालयात या लसीसाठी लाभार्थ्यांना अडीचशे रुपये मोजावे लागणार आहेत.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील १७ हजार ९९ लाभार्थ्यांची लसीकरणासाठी निवड करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात महसूल विभागातील एक हजार आणि पोलीस दलातील जवळपास पाच हजार जणांना ही लस देण्यात आली आहे. आता तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांपेक्षा अधिकचे वय, ४५ वर्ष वय आणि इतर गंभीर आजार असलेल्यांना ही लस दिली जाणार आहे. परंतु, त्यासाठी त्यांना ॲपवर अगोदर नोंदणी करावी लागणार आहे.