कंधार : शहरातील नागरिकांना गत काही वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अखेर पाणीपुरवठा योजनेचा स्वतंत्र विद्युत जोडणीचा प्रश्न मार्गी लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरावरील पाणीटंचाईची टांगती तलवार हटली असून आगामी काळात नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शहराचे पाणीपुरवठ्याचे स्त्रोत असलेले मानार नदी व जगतुंग समुद्र अल्प पर्जन्यमानामुळे कोरडे पडत होते.त्यामुळे शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी गत झाली होती. पाणीटंचाईच्या चक्रव्यूहातून शहराला बाहेर काढण्यासाठी पालिकेने राज्य शासनाच्या सुजल निर्मल अभियान योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव दाखल केला होता. अप्पर मानार प्रकल्पातील (लिंबोटी) पाणी यासाठी गृहीत धरण्यात आले होते. जून २०११ च्या सर्वसाधारण सभेने नवीन पा.पु.यो. आराखडा तयार करण्यासाठी मंजुरी दिली. प्रस्ताव जून २०१३ ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे दाखल झाला. याच महिन्यात संबंधित विभागाने तांत्रिक सहमती दिली. प्रशासकीय मान्यतेसाठी पा.पु.व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिवांकडे प्रस्ताव दाखल झाला़ पाणीपुरवठामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक डिसेंबर २०१३ ला झाली. बैठकीतील निर्देशानुसार म.जी.प्रा. विभागाने आराखड्यास तांत्रिक मान्यता दिली व प्रस्ताव शासनास फेर सादर करण्यात आला. पा.पु.सचिवांनी काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्रुटींची पूर्तता व योग्य दुरूस्ती करून सुधारित प्रस्ताव फेब्रुवारी २०१४ ला मुख्य अभियंता म.जी.प्रा.कडे सादर झाला आणि सुधारित तांत्रिक मान्यता मिळाली. आणि राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २५ कोटी ६७ लाख ७२ हजार किमतीच्या योजनेला प्रशासकीय मान्यता दिली. ई- निविदा प्रसिद्ध झाली. आॅगस्ट २०१४ ला कामाचा कार्यारंभ आदेश संबंधित गुत्तेदारास देण्यात आला. काम पूर्ण करण्याचा कालावधी ३६ महिने देण्यात आला. कामाला धडाक्यात सुरूवात झाली. लिंबोटी प्रकल्पात उद्भव विहीर व संबंधित कामे, पंपगृह, पंम्पिंग मशिनरी, अशुद्ध गुरूत्त्व जलवाहिनी २२.५० कि.मी.,शहराच्या नवीन विकसित भागात वितरण व जलकुंभ आदी कामे प्रस्तावित होती. जवळपास ही कामे पूर्ण झाली. थोडीशी व जुजबी कामे शिल्लक आहेत. मात्र खरा प्रश्न हा विद्युत जोडणीचा होता.११ के.व्ही.एक्स्प्रेस फिडरच्या कामामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न लांबणीवर पडत चालला होता. कोटेशन भरूनही कामाला मुहूर्त लागत नव्हता. नागरिकांना पाणी टंचाईच्या भीषण संकटाचा सामना करावा लागत होता. आजसुद्धा अनेक महिन्यांपासून नागरिकांना दोन दिवसांआड पाणी मिळते. पालिकेतील सत्तापालट व टोकाचे राजकीय हेवेदावे यामुळे योजना कार्यान्वित होण्यास अडथळे येत असल्याचा आरोप नागरिकांतून होऊ लागला.आता विद्युत जोडणी झाली आहे. ९० एच.पी.मोटारीची चाचणी झाली आहे. शहरातील जलवाहिनीचे थोडेसे काम शिल्लक आहे. लिंबोटी ते शहर जलवाहिनी तपासणी केली जात आहे. जलवाहिनी दुरूस्तीचे काम चालू आहे. जी.आय.एस.मॅपिंग करायची आहे. ही कामे झाल्यानंतर मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा होईल. डिसेंबर अथवा जानेवारीत पाणी मिळेल, अशी स्थिती आहे़
- नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी पा.पु.योजनेची कामे पूर्ण होत आली आहेत. शिल्लक थोडी कामे पूर्ण करण्यासाठी भर दिला जाईल.
- महत्त्वाचे विद्युत जोडणीचे काम होते.ते पूर्ण झाल्याने पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे़ डिसेंबर अथवा जानेवारीत पाणी मिळण्याची शक्यता आहे़
पाणीपुरवठा थोड्याच दिवसांत सुरळीत होईलविद्युत जोडणी झाली आहे. जी.आय.एस.सर्वे आॅनलाईन शिल्लक आहे. शहरातील जलवाहिनीचे काही काम अत्यल्प आहे. ही कामे करण्यावर भर दिला जाईल.लिंबोटी प्रकल्पातील ०.५० द.ल.घ.मी. पाणी आरक्षणासाठी पत्र दिले आहे.बारूळ प्रकल्पाच्या बहाद्दरपुरा येथील विहिरीचे १.५० द.ल.घ.मी .पाणी आरक्षित केले आहे. पाणीपुरवठा थोड्याच दिवसांत सुरळीत होईल.- सारंग चव्हाण (प्र.मुख्याधिकारी न.प.कंधार)