उमरी ( नांदेड ) : शिवणगाव रेल्वे स्टेशनजवळ आज सकाळी सात वाजता मालगाडीचा एक डब्बा रुळावरून उतरला. यामुळे मुंबई ते सिकंदराबाद जाणारी देवगिरी एक्सप्रेस दीड तास विलंबाने धावली. या मार्गाने जाणारी सर्व रेल्वे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ( Freight coaches derailed near Shivangaon; Passenger train traffic was disrupted)
आज सकाळी सात वाजताच्या सुमारास नांदेडकडे जाणारी एक मालगाडी शिवणगाव रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करीत असताना एका जोड पटरीवरून खाली उतरली. या गाडीचा एक डबा रुळावरून खाली उतरला. त्यामुळे या मार्गाने जाणारी सर्व रेल्वे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. मुंबईहून सिकंदराबादकडे जाणारी देवगिरी एक्सप्रेस नांदेड येथे थांबविण्यात आली . या गाडीला तब्बल दीड तास उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांची बरीच गैरसोय झाली.
रूळावरून खाली उतरलेली गाडी ही मालवाहतूक गाडी असल्याने कसल्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही. काही वेळानंतर रेल्वे प्रशासनाने यंत्रणा कामाला लावून ही गाडी पूर्ववत पटरीवर ठेवण्यात आली .त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. रेल्वे विभागाचे अभियंता तसेच पोलिस घटनास्थळी पाहणी करीत आहेत. अशी माहिती उमरी येथील उप स्टेशन प्रबंधक भरतलाल मीना यांनी दिली.