नांदेड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सत्ता स्थापन करण्यापूर्वी संविधानानुसार काम करणार असे पत्र घेऊन सोनियांकडे गेले होते काय? सोनियाजींना ते पत्र देऊन मला मुख्यमंत्री करा, अशी विनवणी त्यांनी केली आहे काय? याचे उत्तर शिवसेनेने द्यायला हवे़ असे असल्यास सत्तेसाठी मित्राची ही लाचारी वेदनादायी असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला़ दोन दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सत्ता स्थापनेपूर्वी शिवसेनेकडून लिहून घेतल्याचे वक्तव्य केले होते़
नांदेडात चांदोजी पावडे मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते़ फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी संविधानाप्रमाणे काम करू, असे जर लिहून दिले असेल तर शिवसेना ही यापूर्वी संविधानाप्रमाणे काम करीत नव्हती किंवा सत्तेसाठी लाचार झाली हे दोन मुद्दे असू शकतात़ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकार तीनचाकी रिक्षा असल्याचे म्हणत आहेत़ रिक्षा हे गरिबाचे वाहन आहे़ त्याबद्दल आदरच आहे़ परंतु रिक्षाने नांदेडवरून मुंबईला जाता येत नाही़ त्यासाठी बुलेट ट्रेनच लागते़ कारण रिक्षाला मर्यादा आहे़ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याची भूमिका घेतली होती़ बाळासाहेबांच्या याच भूमिकेशी आत्ताची शिवसेना सहमत आहे काय याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले पाहिजे. अशोकराव चव्हाण हे चिखलीकर यांना धन्यवाद देत असतील़ कारण लोकसभेत पराभवानंतर त्यांना मंत्रीपद मिळाले़ परंतु त्यांचा हा आनंद फार दिवस टिकणार नाही़ या सरकारला जनतेशी काहीएक देणेघेणे नसून आजपर्यंत कमावलेला पसारा सांभाळण्यासाठी त्यांना सत्ता गरजेची आहे़ या सरकारचे खायचे, दाखवायचे आणि बोलायचे दात वेगळे असल्याचे ते म्हणाले.
शिवभोजन थाळीमुळे गरिबांची थट्टामोठ्या थाटात शिवभोजन थाळीला प्रारंभ केला. गरिबांना १० रुपयांत जेवण अशी प्रसिद्धी केली. परंतु नांदेड जिल्ह्याचा विचार करता दरदिवशी फक्त ५०० लोकांना जेवण मिळणार आहे़ त्यासाठीही आधार कार्ड, वेळेचे बंधन पाळावे लागेल. गुरुद्वारा येथे दररोज हजारो भुकेल्यांना लंगरमध्ये जेवण दिले जाते़ ही शिकवण आमच्या गुरुंची आहे़ शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरिबांची थट्टा मांडण्याचा आरोप फडणवीस यांनी केला.