शेतीच्या वादातून पती-पत्नीला मारहाण
मुदखेड तालुक्यातील मुगट येथे शेतीच्या वादातून पती-पत्नीला मारहाण करण्यात आली. ही घटना २९ एप्रिल रोजी घडली. बालाजी तुळशीराम हातागळे हे घरी असताना आरोपी त्या ठिकाणी आले. यावेळी आरोपींनी हातागळे यांच्या आई-वडिलांना जमीन नावावर करून देण्यावरून वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर बालाजी हातागळे आणि त्यांच्या पत्नीला लाकडाने बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणात मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जुन्या भांडणातून मजुराचे डोके फोडले
लोहा शहरातील आंबेडकर नगर भागात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका मजुराचे डोके फोडण्यात आले. ही घटना ३० एप्रिल रोजी घडली. राठोडसिंग नवनिहालसिंग खिची हे घरासमोर उभे असताना आरोपी त्या ठिकाणी आले. यावेळी त्यांनी खिची यांच्यासोबत वाद घालून लोखंडी गजाळीने त्यांचे डोके फोडले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दारूच्या पैशांसाठी तरुणावर हल्ला
शहरातील जगदीश कॉलनी भागात दारूच्या पैशांसाठी तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना २९ एप्रिल रोजी घडली. नितीन बापूराव इंगाेले हा तरुण रात्री ११ वाजेच्या सुमारास रस्त्यावर उभा असताना आरोपी त्या ठिकाणी आला. यावेळी त्याने इंगोले याला दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. परंतु इंगोले यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने इंगोले यांच्यावर चाकूने हल्ला केला. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चिखलवाडीत घरासमोरुन दुचाकी लांबविली
शहरातील चिखलवाडी भागात घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्याने लांबविली. ही घटना २६एप्रिल रोजी घडली. व्यवसायाने वकील असलेल्या श्रीरंग तुकाराम चौधरी यांनी एम.एच.२६, बीआर ९३९१ या क्रमांकाची दुचाकी घरासमोर उभी केली होती. ७० हजार रुपये किमतीची ही दुचाकी लांबविण्यात आली. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.