नांदेड : बहुप्रतीक्षेत असलेल्या नांदेड-यवतमाळ-वर्धा हा नवीन रेल्वे मार्ग मार्गी लागण्याचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय गृह विभागाने १६ डिसेंबर रोजी या मार्गासाठी २५ कोटी ९२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखाधिकारी मध्य रेल्वे यांच्याकडे वितरीत केला आहे.
नांदेड-यवतमाळ-वर्धा या नवीन रेल्वे मार्गाकरिता २ हजार ५०१ कोटी ५ लाख एवढा खर्च अंदाजित असून यापैकी १ हजार कोटी ४२ लाख रुपयांचा ४० टक्के हिस्सा राज्य शासनाकडून केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या प्रकल्पाकरिता केंद्र शासनाने ३१ मार्च २०२० पर्यंत ८१५ कोटी ३२ लाख रुपये खर्च केले असून मार्च २०१९ पर्यंत १९० कोटी रुपये खर्च झाले आहेत.
सदर प्रकल्पातील ४० टक्के हिश्श्यानुसार राज्य शासनाने ३१ मार्च २०२० अखेरपर्यंत ४५५ कोटी ११ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सन २०२०-२१ करीता अर्थसंकल्पीत झालेल्या निधीपैकी या प्रकल्पाकरिता उत्तर मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी २ सप्टेंबर २०२० रोजी केलेल्या मागणीनुसार २५ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाचे कार्यासन अधिकारी जयसेन इंगोले यांनी जारी केले आहेत. हा निधी उपलब्ध करून दिल्याने नांदेड-यवतमाळ-वर्धा या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला गती प्राप्त होणार आहे.