- सचिन मोहिते
नांदेड : बेभरवशी निसर्ग, शेतीमालाचे पडलेले भाव, कर्जाचा वाढता डोंगर आणि संसारगाडा चालविण्याच्या विवंचनेत शेतकरी आत्महत्यांचे सत्रच सुरू आहे. २०१४ पासून गेल्या बारा वर्षांत जिल्ह्यात तब्बल १ हजार ५७३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून एक लाखाचा धनादेश देऊन तोंडाला पाने पुसण्यात येतात; परंतु या कुटुंबाची कधीही भरून न येणारी हानी या तुटपुंज्या मदतीत कशी भरून निघणार. त्यातच गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने छदामही दिला नाही हे वास्तव आहे.
विदर्भातील महागाव तालुक्यातील एका कुटुंबाने १९८६ मध्ये नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. देशातील शेतकरी आत्महत्येची ही पहिली नोंद झाली होती. त्यानंतर गेली ४१ वर्षे राज्यात हजारो शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणामुळे मृत्यूचा फास कवटाळला. राज्यात या काळात सत्तेत आलेल्या पक्ष्यांनी पीक विमा, कर्जमाफी, खत खरेदीत सवलत अशी वरवरची मलमपट्टी केली; परंतु शेतकऱ्यांची मूळ अडचण मात्र अद्यापही धोरणकर्त्यांना कळालीच नाही. परिणामी जगाचा पोशिंदा आज तिळ-तिळ मरत आहे.
एकट्या नांदेड जिल्ह्यातच गेल्या बारा वर्षात १ हजार ५७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात सर्वाधिक १९० आत्महत्या या २०१५ या वर्षात झाल्या आहेत. त्या खालोखाल २०१६ मध्ये १८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यातही सर्वाधिक आत्महत्या या पावसाळ्यातील ऑगस्ट महिन्यात झाल्या आहेत. अतिवृष्टीमुळे या एका महिन्यात गेल्या बारा वर्षांत १६६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून एक लाख रुपयांची मदत दिली जाते. परंतु ही मदत मिळविण्यासाठी शेतकरी कुटुंबाला अग्निदिव्यातून जावे लागते. जिल्हा परिषद, पोलिस, कृषी विभाग आणि आरोग्य विभागाकडून मदतीसाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतरच ही मदत दिली जाते.
ऑक्टोबरपासून छदामही मिळाला नाहीआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदतीसाठी शासनाकडे सव्वा कोटी रुपये थकीत आहेत. त्यापैकी जिल्हा प्रशासनाने ९० लाखांची मागणी केली आहे; परंतु ऑक्टोबर २०२४ पासून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी शासनाकडून छदामही आला नाही. लाडकी बहीण योजनेमुळे शासनाने इतर योजनांचा निधी वळविला आहे. त्याचा फटका कर्ता पुरुष गेलेल्या लाडक्या बहिणींच्या मदतीलाही बसला आहे.
कोणत्या वर्षात किती आत्महत्याजिल्ह्यात २०१४ मध्ये ११९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. २०१५- १९०, २०१६-१८०, २०१७-१५३, २०१८-९८, २०१९-१२२, २०२०-७७, २०२१-११९, २०२२- १४७, २०२३-१७५, २०२४- १६७ आणि २०२५ या वर्षात आतापर्यंत २६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
शेतकऱ्यांचा अन्नत्याग दिन१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून पत्नी आणि मुलीसह आत्महत्या केली होती. स्वातंत्र्यानंतर शेतकरी आत्महत्येची ही पहिली घटना म्हणून नोंद झाली होती. तेव्हापासून शेतकरी आत्महत्येचे हे सत्र सुरुच आहे. या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि शासनाचे शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी १९ मार्च रोजी शेतकरी एक दिवस अन्नत्याग करतात. तसेच राज्यपालांना पत्र पाठवून शेतकऱ्यांच्या वेदना कळवितात. अशी माहिती संयोजक अशोक वानखेडे आणि डॉ.राजेश माने यांनी दिली.