आपली सुरक्षा करणारे, दिवसरात्र आपल्या सुखसोयीसाठी मेहनत व जिवाचे रान करणारे पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी चांगल्या प्रकारचे व्यवस्थापन नाही. या दृष्टिकोनातून गृहविभागाच्या हाउसिंग विभागाला नांदेडच्या स्नेहनगर पोलीस वसाहतीच्या नवीन बांधकामाचा यामध्ये सर्व मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यासंबंधित प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव मंत्रालयात येऊनसुद्धा तीन ते चार वर्षे लोटली आहेत. परंतु अद्यापसुद्धा सदरील प्रस्तावावर कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या स्नेहनगर, पोलीस वसाहतीत ७७ इमारती आहेत. त्यामध्ये पोलीस अधिकारी, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हेडकॉन्स्टेबल, पोलीस नाईक, पोलीस कर्मचारी यांच्यासाठी बांधलेले एकूण ९७५ घरे आहेत. सदरील पोलीस वसाहत पस्तीस वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेली आहे, पोलीस वसाहतीमधील सगळ्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. पोलीस वसाहतीच्या जवळच ५०० मीटरवर श्रीनगर येथे भूकंपकेंद्र आहे. वेळोवेळी भूकंपाच्या धक्क्याने सर्व इमारतींना नुकसान पोहोचले आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व इमारती मोडकळीस आल्या आहेत, या वसाहतीत एकूण १२०० ड्रेनेज चेंबर यापैकी ३०० ड्रेनेज चेंबर व ड्रेनेज पाइपलाइनचे काम करणे आवश्यक आहे. फुटलेल्या ड्रेनेज लाइन व पाइपलाइनमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्नेहनगर पोलीस वसाहतीत सर्व प्रकारच्या मूलभूत सोयी सुविधांची आवश्यकता आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन-तीन वर्षापासून मंत्रालयात पडून असलेल्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी देऊन, नव्याने ७७ इमारती बांधण्याबाबत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मागणीला सकारात्मकता दर्शविली आहे.
स्नेहनगर पोलीस वसाहतीतील इमारती बांधण्याबाबत निधी उपलब्ध करून द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:31 AM