लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : बरडशेवाळा येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेसमोरच २० सप्टेंबर रोजी पुन्हा एक अंत्यविधी उरकण्यात आला़ यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे़ परंतु, या गंभीर प्रकाराकडे शिक्षण विभाग वा महसूल विभाग लक्ष द्यायला तयार नाही़ त्यामुळे येथील पालक तानाजी पवार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करून येथे अंत्यविधी करण्यास मज्जाव करण्याची मागणी केली आहे़शाळेसमोर वा अंगणवाडीसमोर अंत्यविधी करणे हा गंभीर प्रकार आहे़ ज्या ठिकाणी अंत्यविधी करण्यात आला, तोच मार्ग शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आहे़ कित्येकदा शाळा सुरू असतानाही हा विधी सुरु असतो़ त्यामुळे या अग्नीचा धूर शाळेत जातो़ अंत्यविधी लावून नातेवाईक घराकडे जातात़ मात्र शाळेतील व अंगणवाडीचे विद्यार्थी हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहतात़ कधी या प्रेताचे पाय बाजूला पडतात़ तर कधी हात़ हे भयाण दृश्य विद्यार्थ्यांना दिसते़ यामुळे विद्यार्थी कित्येकदा आजारी पडतात़ शिक्षिकाही आजारी पडतात़ त्यांच्याही मनात भीती निर्माण होते़ग्रामपंचायत सदस्य प्रेम मस्के, प्रभाकर दहिभाते यांनी हा प्रकार बंद करण्याचा प्रयत्न केला़ परंतु, मागासवर्गीय समाजाला अंत्यविधीसाठी इतर ठिकाणी जागा नसल्याने अंत्यविधी करावा कुठे? असा प्रश्न नातेवाईक करतात़ विद्यार्थ्यांचे पालक व अंत्यविधी करणारे नातेवाईक यांच्यात काल वाद झाला़ परंतु, अंत्यविधी थांबविताही येत नाही़
नांदेड जिल्ह्यात अंगणवाडीसमोर पुन्हा एक अंत्यविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 1:17 AM