भोकर (नांदेड ), दि. २६ : चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावताना ह्रदय विकाराने मृत्यू झालेल्या भोकर येथील सुभेदार नरसींग शिवाजी जिल्लेवाड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात भोकर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैनीक व पोलीसांच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. ' शहीद जवान.. अमर रहे' या जयघोषात हजारों नागरिकांनीही त्यांना यावेळी अभिवादन केले.
प्रफुल्लनगर येथील रहिवासी नरसींग शिवाजी जिल्लेवाड हे भारतीय तिबेट सीमा सुरक्षा पोलीस दलात सुभेदार या पदावर कार्यरत होते. मंगळवारी २२ रोजी चीनच्या सीमेवर कर्तव्यावर हजर असताना ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव गुवाहाटी येथून हैदराबादमार्गे भोकर येथे आज सकाळी ९ च्या दरम्यान त्यांच्या घरी आणण्यात आले. नागरिकांच्या अंतीम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव तेथे ठेवण्यात आले. दुपारी १२ वाजता शहरातील मुख्य रस्त्याने भारत माता की जय, वंदे मातरम, जबतक सुरज चांद रहेगा नरसींग जील्लेवाड का नाम रहेगा अशा जयघोषात रथावरुन अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत परिसरातील हजारो नागरिक सामील झाले होते.
स्मशानभूमीत भारतीय सैन्य व पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना सलामी देण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय अधिकारी दिपाली मोतीयेळे, विभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पो.नि. आर.एस.पडवळ, शहिद पीता गतपतराव गोवंदे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, सभापती जगदिश पाटील भोसीकर, नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड, नगर उपाध्यक्ष गोविंद बाबा गौड, जि.प.सदस्य बाळासाहेब रावणगावकर, दिवाकर रेड्डी, नागनाथ घिसेवाड, सेना तालुका प्रमुख सतीश देशमुख, सुभाष पाटील घोगरीकर, संचालक गणेश कापसे, प्रा.व्यंकट माने यांचेसह सैन्यातील जवान, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, विविध पक्ष, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.
भोकरचे भुमीपुत्र जवान नरसींग जील्लेवाड यांच्या मृत्यू ची वार्ता शहरात येताच परिसरात दु:खाची छाया पसरली होती. अंत्यविधीच्या दिवशी शनिवारी शहरातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतीष्ठाणे स्वंयस्पुर्तीने बंद ठेवली होती. शहिद जवान यांच्या घरची आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याने त्यांच्या परिवाराच्या मर्जी नुसार नरसींग जील्लेवाड यांच्या एका मुलीस दत्तक घेण्यात येत असल्याचे निवृत्त मंडळ अधिकारी डुबुकवाड यांनी जाहिर केले.