गडगा : सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगाव यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गडगा-कौठा रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम एका दिवशी करण्यात आले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी ते बंद करण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर अजूनही जसेच्या तसे असंख्य खड्डे शिल्लक आहेत. परिणामी, खड्डे बुजविण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले का? असा प्रश्न नावंदी, केदारवडगाव, टेंभूर्णी गावच्या ग्रामस्थांसह वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.
नायगाव व कंधार या दोन तालुक्यांना जोडणारा गडगा- कौठा हा एकमेव मार्ग आहे. उपरोक्त मार्गावर गडगा, नावंदी, केदारवडगाव, टेंभुर्णी, चौकी महाकाया, शिरूर, कौठा ही गावे येतात. या गावच्या ग्रामस्थांचा दळणवळणासाठी या रस्त्याशी नेहमी संबंध येतो. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. छोट्या खड्ड्यांचे रूपांतर मोठ्या विस्तीर्ण खड्ड्यात झाले आहे. शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून काम करण्यात आले नाही. अशातच ऊसतोडणी सुरू झाली. त्यातच रस्त्यावर असंख्य खड्डे निर्माण झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाची वाहतूक करणे अवघड झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले ही बाब ‘लोकमत’ने सविस्तरपणे प्रकाशित करताच संबंधित विभागाने खड्डे बुजविण्याचे काम एका कंत्राटदाराला दिले. संबंधित कंत्राटदाराने ४ डिसेंबर रोजी खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. एकाच दिवशी घाईघाईने असंख्य खड्डे चुकवून काम केले आणि दुसऱ्या दिवशी ते बंदही झाले. आता राहिलेले खड्डे कोण बुजविणार? असा प्रश्न उपरोक्त गावच्या ग्रामस्थांसह वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.
( गडगा- कौठा रस्त्यावरील अशा पद्धतीने खड्डे शिल्लक असल्याचे छायाचित्र १० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचला घेतले आहे.)