- वसंत जाधव
गडगा : चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याने यातून गावाचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक असताना तसे होताना दिसत नाही. या निधीतून आत्मकेंद्रित प्रगती कशी साधता येईल, या स्वार्थी हेतूने नायगाव तालुक्यातील दहा-बारा गावांच्या केंद्रस्थानी असलेले गडगा गाव शासकीय निधीतील लाखो रुपयांच्या घोटाळ्याने चर्चेत आले आहे.
पाच हजार लोकसंख्या, ८४० उंबरठे, चार प्रभाग, अकरा सदस्य असलेली ग्रामपंचायत..चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली़ परंतु हा निधी योग्यप्रकारे मार्गी लागला नाही. याउलट लाखो रुपयांच्या निधीच्या घोटाळ्याने गावविकासाचे तीनतेरा वाजले आहेत. यासंदर्भात वेद माळगे, भानुदास बंडेवाड, मारोती घोरपडे यांनी पुढाकार घेतला गावातील शंभरांहून अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्षरीने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. त्यानंतर नांदेड जि.प.च्या पंचायत विभागाचे अधिकारी, यांच्यासह गटविकास अधिकारी माधव केंद्रे आदींनी प्रत्यक्ष गावात येवून ग्रामपंचायतअंतर्गत चौदाव्या वित्त आयोगातर्फे ग्रामपंचायतने केलेल्या कामांंना गावकऱ्यांच्या समक्ष भेटी देवून जायमोक्यावर भौतिक पाहणी तसेच पंचनामा केला. त्यावेळी निदर्शनास आलेल्या गंभीर बाबींची नोंद करण्यात आली.
आता याप्रकरणी चौकशी अहवाल जि. प. च्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सादर करण्यात आला. चौदाव्या वित्त आयोगातंर्गत सन २०१५-१६ ते २०१७-१८ याकालावधीत झालेल्या कामाच्या संदर्भात यापूर्वीच मा.प्रकल्प संचालक जि.ग्रा.वि. अ.जि.प.नांदेड व उप मु.का.अ.(पं) जि.प.नांदेड यांनी अनुक्रमे १८ जून २०१९ व १७ जून १०१९ अन्वये केलेल्या चौकशी अहवालात दोषी विरुद्ध नियमाप्रमाणे कार्यवाही प्रस्तावित आहे. ग्रामसेवक यरसनवार यांनी ग्रामसेवक एन.डी.माने यांना चौदाव्या वित्त आयोगातंर्गत कोणतेही अभिलेखे पदभारामध्ये दिले नाहीत. अशा लेखी जबाब दिलेले असून यासंदर्भात यरसनवार यांना अभिलेखे सादर करण्याविषयी वारंवार सूचना देवूनही त्यांनी उपरोक्त उचल केलेल्या रक्कमेचे कॅशबुक, प्रमाणके, मोजमाप पुस्तिका इ. कोणत्याही प्रकारचे अभिलेखे चौकशीदरम्यान सादर न केल्याने २ लाख ३४०६० रुपये हे कोणत्या कामासाठी व कोणास अदा केले हे अभिलेखे समजू शकले नाही. ग्रामसेवक हे ग्रामपंचायतचे सचिव या नात्याने ग्रामपंचायतमध्ये झालेल्या जमा व खर्चाच्या हिशेब वेळच्यावेळी कॅशबूकमध्ये नोंदवणे अनिवार्य आहे. कर्तव्यावर असताना अधिनियम, व ग्रामपंचायत लेखासंहिता याचे काटेकोरपणे पालन करणे हे कर्तव्य आहे. परंतु तसे झाले नाही. बदली झाल्यावर देखील यरसनवार यांनी पदभारामध्ये अभिलेखे दिलेली नाहीत. उपरोक्त उचल केलेली रक्कम २ लाख ३४ हजार ६० रुपयांचा संशयित अपहार केल्याचे तसेच आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास येते, असा गंभीर ठपका या चौकशी अहवालात ठेवण्यात आला.
एकाच दिवश्ी लाखो रुपये उचलल्याचा आरोपसन २०१८-१९ व २०१९ या कालावधीत सरपंच म्हणून चंद्रकलाबाई कोंडलवाडे हे कार्यरत आहेत. याच काळात ग्रामसेवक म्हणून एन.एस.यरसनवार, एन.डी.माने यांनी कारभार पाहिला आहे. यात चौदाव्या वित्त आयोगातंर्गत सन २०१८-१९ मध्ये जमा २९ लाख ४ हजार ५४१ रुपये पैकी १४ लाख ४ हजार ८५५ रुपए खर्च दाखवले़ उर्वरित ११लाख २०हजार रुपये शिल्लक आहेत. ती रक्कम जमा आहे का? कसे? हा संशोधनाचा विषय आहे. तत्कालीन ग्रामसेवक यरसनवार व सरपंचांनी ९ जुलै २०१८ रोजी एकाच दिवशी वेगवेगळ्या तीन धनादेशाद्वारे अनुक्रमे ४० हजार रुपये, १ लाख ९ हजार ६० रुपए, ४५ हजार रुपये तसेच १३ जूलै २०१८ रोजी ४० हजार रुपये अशी एकूण २ लाख ३४ हजार ६० रुपये रक्कम उचल केल्याचा आरोप आहे.