- गोविंद टेकाळेअर्धापूर ( नांदेड): तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी आज चक्क रेड्याला दुग्धाभिषेक घालत आंदोलकांनी गांधीगिरी केली. चाळीस दिवसात आरक्षण देण्याचे आश्वासनाचा विसर पडू नये म्हणून राज्य सरकारचे लक्ष वेधून घेतल्याचे आंदोलकांनी सांगितले.
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विद्यमान सरकारवर मराठा समाजाने भरवसा ठेवला आहे. याच भरोश्याला तडा न जाता शासनाने तात्काळ आरक्षण जाहीर करण्याची सुबुद्धी द्यावी. असे गणपती बाप्पा कडे साकडेही घातले. मागील नऊ दिवसांपासून अर्धापूर तालुक्यातील मराठा समाजाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून उपोषण स्थळी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधल्या जात आहे.
आज तालुक्यातील दाभड, बामणी, खैरगाव आणि वाहेदपुर वाडी या गावातील मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले. दरम्यान, भोकरफाटा ते अर्धापूर महामार्गावरून रेड्यासह भगव्या पताका घेऊन 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत रॅली काढण्यात आली. आंदोलन स्थळी ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख पिंपळगावकर यांनी किर्तन प्रबोधनाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली.