नांदेड : लोहा तालुक्यातील ढाकणी शिवारातील फॅक्ट्रीमधून हळदीचे पोते चोरी करणाऱ्या टोळीचा शोध लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे़ दरम्यान, या टोळीतील दोघांना वसमत ( जि़ हिंगोली ) येथून पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १२ लाख ७५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
लोहा तालुक्यातील ढाकणी शिवारात असलेल्या हळदीच्या फॅक्ट्ररीमधून २० ते २५ दिवसांपूर्वी १०५ हळदीचे पोते चोरीला गेले होते़ याप्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान, या सदर चोरी करणाऱ्या टोळीविषयी स्थानिक गुन्हे शाखेस माहिती मिळाली़ यानंतर स्थागुशाचे पोलीस निरिक्षक सुनील निकाळजे यांनी आरोपींच्या शोधासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक पी़ डी़ भारती व पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले़ सदर पथकाने ५ सप्टेंबर रोजी आरोपींचा शोध घेऊन या टोळीतील आरोपी प्रकाश तुकाराम गव्हाणे (वय ३० रा़ रेल्वेस्टेशन, राहुलनगर, वसमत) व दगडू उर्फ बंडू कोंडीबा खंदारे (वय ३४ रा़सिद्धार्थनगर मालेगाव, ता़अर्धापूर, ह़मुग़णेशनगर, वसमत) यांना पकडले़
दरम्यान, त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली़ १२ आॅगस्ट रोजी साडेअकरा ते १३ आॅगस्ट रोजी रात्री दीड वाजेदरम्यान ढाकणी शिवारातील फॅक्ट्रीमधून १०५ पोती हळद चोरी केली़ चोरी करताना त्याच्या सोबत अन्य १० साथीदार होते तसेच सदर हळद वसमतच्या नवीन मोंढा येथील श्री महर्षी मार्कंडेय ट्रेडींग कंपनी येथे विक्री केल्याचे सांगितले़ चोरट्यांनी दिलेल्या कबुलीनंतर स्थागुशाच्या पथकाने वसमत येथील ट्रेडींग कंपनीच्या मालकास ६ सप्टेंबर रोजी ताब्यात घेऊन त्यांच्याकडील ९० क्विंटल हळद हस्तगत केली़ त्या हळदीची किंमत जवळपास ६ लाख ७५ हजार रूपये आहे़ तर सदर आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला आयशर टेम्पो एएच १२ एचडी ६५७५ किंमत अंदाजे ६ लाख रूपये, असा एकूण १२ लाख ७५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे़ सदर कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ़अक्षय शिंदे, पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पी़डी़भारती, सपोउपनि रमेश खाडे, पोहेकॉ़दत्ता वाणी, महेश कुलकर्णी, शेख जावेद, व्यंकट गंगुलवार,गजानन बयनवाड, ब्रह्मानंद लामतुरे, शेख कलीम यांनी पार पाडली़
आरोपींना दिले सोनखेड पोलिसांच्या ताब्यातसदर आरोपींना सोनखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़ या टोळीचा मोरक्या महेंद्र करवंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूद्ध हिंगोली जिल्ह्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत़ सदर आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे़