नांदेड : शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून असलेल्या वसंतनगर, बाबानगर परिसरात मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे या भागातील मोकळ्या भूखंडधारकांना नोटीस बजावण्याची मागणी होत आहे.
वाहनधारकांना खोदकामाचा अडथळा
नांदेड : नांदेड ते वसमत या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. परंतु, या कामाला गती मिळत नसल्याने वाहनचालकांना खोदून ठेवलेल्या रस्त्यावरुनच जावे लागत आहे. खोदकाम केल्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर रस्त्यावर मुरूम टाकल्याने वाहनचालकांना धुळीचा नाहक त्रास होत आहे. येथील खोदकामावर पाणी मारण्याची मागणी होत आहे.
अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी
नांदेड : चैतन्यनगर ते टिळकनगर या पीरबुर्हाणनगरमधून आलेल्या रस्त्यावर पीरबुर्हाण चाैकात मोठ्या प्रमाणात हाॅटेल व्यावसायिक तसेच इतर दुकानदारांनी अतिक्रमण करून फूटपाथसह रस्ताही व्यापला आहे. त्यामुळे येथून दोन वाहनांना एकाचवेळी जाण्यासाठी जागा मिळत नाही. परिणामी तासन् तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या भागातील अतिक्रमण काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
कौठ्यात रस्ता नादुरूस्त
नांदेड : नवीन नांदेड भागातील काैठ्यातील मुख्य रस्ता असलेला पोलीस चाैकी ते जुना काैठा पूल हा रस्ता नादुरूस्त झाला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच काही ठिकाणी चेंबर्सची झाकणे रस्त्यापेक्षा वर आल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा रस्ता दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.
झाडांना देताहेत पाणी
नांदेड : नांदेड शहरातील आयटीआय चाैक ते अण्णाभाऊ साठे चाैक या रस्त्याच्या दुभाजकात लावलेली झाडे जिवंत ठेवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. या झाडांना मनपा व सचखंड गुरूद्वारा यांच्याकडून पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे ही झाडे बहरली आहेत. याचप्रमाणे शहरातील अन्य रस्त्यांवरील झाडांचीही काळजी घेतली जात आहे.