नांदेड : इतवारा पोलिसांनी एका ट्रकचालकाला पकडून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे जप्त केली. या प्रकरणात संशयित आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहर व जिल्ह्यात गावठी कट्टा आता सर्रासपणे आढळून येत आहेत तसेच गेल्या काही दिवसांत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे जप्त केले आहेत. इतवारा पोलिसांचे पथक शुक्रवारी पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना एका ट्रकचालकाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे प्रमुख पोउपनि दत्तात्रय काळे, विक्रम वाकडे, सत्तार, चाऊस यांनी माळटेकडी परिसरात ट्रकचालक अमजदखान अनवरखान, (रा. इकबाल नगर) याला थांबवून झाडाझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे गावठी बंदूक आणि काडतुसे आढळली. पोलिसांनी बंदूक आणि काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणात पोउपनि दत्तात्रय काळे यांच्या तक्रारीवरून इतवारा पोलिसांनी गुन्हा नोंदविला. संशयिताला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.