अभिनव आंदोलनांनी गाजला दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:07 AM2018-11-01T00:07:26+5:302018-11-01T00:13:26+5:30

युवक काँग्रेस, मराठवाडा जनता विकास परिषद, शिक्षक, आशा व गटप्रवर्तक यांच्या अनोख्या आंदोलनाने नांदेडकरांचे लक्ष वेधून गेले होते़ तर बिलोलीत दुष्काळ जाहीर न करणाऱ्या शासनाच्या विरोधात एका पायावर उभे राहून आंदोलन करण्यात आले़

Gazla Day by Innovative Movements | अभिनव आंदोलनांनी गाजला दिवस

अभिनव आंदोलनांनी गाजला दिवस

googlenewsNext
ठळक मुद्देसरकारविरोधात असंतोष मजविप, युवक काँग्रेस, आशा, गटप्रवर्तक उतरले रस्त्यावर

नांदेड : जिल्ह्यात बुधवारचा दिवस अभिनव आंदोलनांनी गाजला़ युवक काँग्रेस, मराठवाडा जनता विकास परिषद, शिक्षक, आशा व गटप्रवर्तक यांच्या अनोख्या आंदोलनाने नांदेडकरांचे लक्ष वेधून गेले होते़ तर बिलोलीत दुष्काळ जाहीर न करणाऱ्या शासनाच्या विरोधात एका पायावर उभे राहून आंदोलन करण्यात आले़
आशा व गटप्रवर्तक कर्मचारी फेडरेशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या़ यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता़ शेष फंडातून आशा व गटप्रवर्तकांना पाच हजार रुपये बोनस स्वरुपात दिवाळी भेट द्यावी़ ११ सप्टेंबर २०१८ रोजी पंतप्रधानांनी घोषणा केलेल्या पगारवाढीची तात्काळ अंमलबजावणी करावी़ आशा कर्मचा-यांना वस्तुनिष्ठ कामांच्या मूल्यमापनासाठी जननी सुरक्षा योजनेतील एपीएल, बीपीएल भेद तात्काळ रद्द करा़, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी आशा वर्कर्सना मूलभूत सोयींनीयुक्त आशा कक्षाची सोय करा, आशा व गटप्रवर्तकांना मिळणारा मोबाईल भत्ता अत्यल्प असून तो दरमहा पाचशे रुपये करावा़ जे़एस़वाय़ लाभार्थ्यांचे खाते नसल्यास आशांना केलेल्या कामाचा मोबदला मिळत नाही़ सदर अट रद्द करा व केलेल्या कामाचा मोबदला आशांना द्या, आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन मिळत नसल्याने तसेच त्यांच्या कामानुसार मिळणारा मोबदला सहा महिने उशिरा मिळत असल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते़ बैठका, प्रशिक्षणासाठी तालुका, जिल्हा पातळीवर यावे लागते़ त्यासाठी प्रवासभत्ता देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला़ यावेळी कॉ़उज्ज्वला पेंडलवार, कॉ़विजय गाभणे, कॉग़ंगाधर गायकवाड, कॉ़जयश्री मोरे यांची उपस्थिती होती़
शासनाच्या विरोधात शिक्षकांनी पाळला काळा दिवस

  • महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या सर्व शिक्षक-शिक्षिका व इतर विभागातील कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना पूर्वरत सुरु करण्यास शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे ३१ आॅक्टोबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. अन्यायकारक अंशदायी पेन्शनच्या शासन निर्णयाला १३ वर्षे पूर्ण झाले आहेत़ १ नोव्हेंबर २००५ नंतर रूजू झालेल्या शासकीय कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना नाकारून ३१ आॅक्टोबर २००५ रोजी शासनाने अंशदायी पेन्शन योजनेचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे यानंतर रूजू शासकीय कर्मचा-यांच्या मृत्यूनंतर हजारो कुटुंब उघड्यावर पडले आहेत़ तसेच जिवंतपणीच लाखो कर्मचा-यांना भविष्याची चिंता सतावत आहे.
  • या नवीन अंशदायी पेन्शन योजनेमुळे शिक्षकांच्या पगारातून दरमहा दहा टक्के रक्कम कपात होते. तेरा वर्षे उलटली तरी या रकमांचा हिशेब मिळत नाही. भविष्यात या संचित रकमेवर मिळणारी पेन्शन शेअर बाजारातील गुंतवणुकीवर आधारित असल्याने त्यात प्रचंड अनिश्चितता आहे. राज्यातील लाखो कर्मचारी या शासन निर्णयाच्या विरोधात असूनही शासन अजून निर्णय घेत नसल्याने या शासन निर्णयाच्या निषेधार्थ शिक्षक व सर्व शासकीय कर्मचा-यांनी बुधवारी शाळेत, कार्यालयात काळ्या फिती लावून काम केले़ महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जी.एस.मंगनाळे, आनंद पवार, एस.एम.सावळे, शिवाजी सूर्यवंशी, एम.के. यलगंधलवार,राजेंद्र बोडके आदी उपस्थित होते़


फेरवाटपासाठी नवीन लवादाची गरज
नांदेड : मराठवाड्यावर यंदा दुष्काळाचे भीषण संकट ओढवले आहे़ त्याच्या झळा येत्या उन्हाळ्यात अधिक तीव्र होणार आहेत़ अशा परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदार व राजकीय पुढा-यांनी शासनावर दबाव टाकून जायकवाडीसाठी सोडलेले पाणी बंद केले़ त्यामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यावर मोठे संकट ओढवले आहे़ मराठवाड्याच्या हिश्श्याचे पाणी कायमस्वरुपी मिळण्यासाठी पुन्हा एकदा गोदावरीच्या पाण्याचे फेरवाटप करण्यासाठी नवीन लवाद निर्माण करण्याची मागणी डॉ़ व्यंकटेश काब्दे यांनी केली़
मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने बुधवारी पश्चिम महाराष्ट्रातील पुढा-यांच्या दंडेलशाही व राज्य शासन, जलसंपदा नियमन प्राधिकरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली़ यावेळी डॉक़ाब्दे बोलत होते़ ते म्हणाले, बाभळी बंधाºयाला पाणी मिळत नाही़ मानारचे कालवे नादुरुस्त आहेत़लेंडी प्रकल्प रखडला आहे़ मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी पुन्हा एकदा मराठवाडा पातळीवर जनआंदोलन उभे करावे लागणार आहे़ आंदोलनात जिल्हाध्यक्ष द़ मा़रेड्डी, शहराध्यक्ष प्रा.उत्तमराव सूर्यवंशी, माजी आ़ डी़ आऱ देशमुख, फारुख अहेमद, प्रा़ शारदा तुंगार, भाऊसाहेब मोरे, प्रा़ बालाजी कोम्पलवार, कॉ़ जामकर, शिवराज पाटील, संदीप बोडके, डॉ़ किरण चिद्रावार, डॉ़ विकास सुकाळे, डॉ़अशोक सिद्धेवाड, प्राचार्य टी़एम़पाटील, एम़एफ़शेख, देवदत्त तुंगार, कुंजम्मा काब्दे उपस्थित होते.


युवक काँग्रेसचे निषेधासन
नांदेड : भाजपा सरकारच्या कारभाराला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहर व जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर प्रतीकात्मक निषेधासन आंदोलन करण्यात आले़ यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनेक योगासने करुन सरकारच्या कारभारावर व्यंगात्मक टीका केली़
भाजप सरकारच्या निष्क्रिय कारभाराला चार वर्षे पूर्ण झाली असून सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले़ यावेळी सरकारच्या विविध योजनांचा कसा फज्जा उडाला याचा खरपूस समाचार घेण्यात आला़ त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेधासन हे अभिनव आंदोलन हाती घेतले होते़ यावेळी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, अतुल वाघ, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अब्दुल गफार, उत्तरचे सत्यजित भोसले, दक्षिणचे महासचिव शंकर स्वामी शेवडीकर, जेसिका शिंदे, बालाजी सूर्यवंशी तळणीकर, श्याम कोकाटे, सुरेश हाटकर, गोपी मुदीराज, उमेश कोटलवार, सतीश बस्वदे, श्याम आढाव, राहुल देशमुख, अझर कुरेशी, अतुल बनसोडे, सुषमा थोरात, संदीप गायकवाड, काशीनाथ तिडके, सय्यद नौशाद, अरविंद देगावे, विवेक राऊतखेडकर, आदित्य देवडे, अतुल पेद्देवाड यांची उपस्थिती होती़ युवक काँग्रेसच्या या अभिनव आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले होते़

एका पायावर केले आंदोलन
बिलोली : तालुक्यात यंदा ५८ टक्केच पाऊस झाल्याने मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचे उत्पादन घटले आहे. आता रबीतील ज्वारी, हरभरा या पिकांची पेरणी झालेली नसून यंदाचा रबी हंगाम पूर्णत: वाया गेला आहे. बिलोली तालुक्यातील शेतकºयांची दयनीय अवस्था झालेली असून सोयाबीन, उडीद व मूग पिकांची तात्काळ नुकसानभरपाई देऊन बिलोली तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे. तसेच बिलोली तालुका दुष्काळग्रस्त जाहीर न करणा-या शासनाचा काँग्रेसकडून एका पायावर उभे राहून निषेध करण्यात आला. यावेळी माजी आ. रावसाहेब अंतापूरकर, तालुकाध्यक्ष शिवाजी पा.पाचपिंपळीकर, उपाध्यक्ष माधव जाधव, न. प. उपनगराध्यक्ष मारोती पटाईत, भीमराव जेठे, नगरसेवक अमजद चाऊस, नगरसेविका राधा पटाईत, सुंकलोड, खय्युम पटेल डौरकर, अविनाश पाटील पत्के, दीप इंगळे आदी उपस्थित होते़

Web Title: Gazla Day by Innovative Movements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.