नांदेड : राष्ट्रीय /नागरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात सुरूहोणार्या नवीन चार रूग्णालयातंर्गत रूग्णांना मोठय़ा आजारासाठी माफक दराने जेनेरिक औषधी देण्यात येणार आहेत.
शहरात सहा लाख लोकसंख्या असून गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी महापालिकेच्या रूग्णालयांकडे सोपविण्यात आली आहे. परंतु मनपाच्या रूग्णालयांची यंत्रणा तोकडी पडत आहे. शहरातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नवीन चार रूग्णालय लवकरच सुरू होणार आहेत. या योजनेचा एक भाग म्हणून प्रत्येक वार्डात महिला आरोग्य समितीची स्थापना करण्यात येणार आहे. गरोदर मातांवर विशेष लक्ष देवून जननी सुरक्षा योजनेतंर्गत मोफत आहार व मोफत रूग्णवाहिका पुरविण्यात येणार आहे.
सध्या महापालिकेचे दोन मातृसेवा केंद्र व १0 प्राथमिक आरोग्य उपचार केंद्र सुरू आहेत. त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त नवीन इमारती बांधण्यात आल्या होत्या. त्यापैकी जंगमवाडीची इमारत लॉयन्स क्लबला तर श्यामनगरची इमारत महिला रूग्णालयासाठी देण्यात आली. सांगवी, कौठा, जंगमवाडी, शिवाजीनगर, खडकपुरा, अरबगल्ली, करबला, इतवारा, सिडको, तरोडा या ठिकाणी महापालिकेचे रूग्णालये आहेत. यातील काही रूग्णालये बंद स्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर श्रावस्तीनगर, तरोडा, कौठा, खुशालसिंघनगर या ठिकाणी नवीन रूग्णालयांची स्थापना करून त्याअंतर्गत जेनेरीक औषधी देण्याचा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
त्यापैकी श्रावस्तीनगर येथे लवकरच रूग्णालय सुरूकरण्यात येत असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. मिरा कुलकर्णी यांनी दिली.
सदरील औषधी दुकानात इतर औषधी दुकानापेक्षा अत्यंत कमी दराने औषधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्याची अत्यंत महत्वाची फक्त जेनेरिक औषधी उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत.
-----------
मधुमेह, र्हदयविकार, पक्षघात, मेंदूज्वर, कॅन्सर आदी मोठय़ा आजारासाठी रूग्णांना औषधीसाठी लागणारा खर्च मोठय़ा प्रमाणात करावा लागतो. यासाठी संबंधित रूग्णांच्या कुटुंबाला कर्जबाजारी होण्याची वेळ येते. गरीब रूग्णांना हा खर्च झेपत नाही. त्यामुळे रूग्णांचे औषधीविना हाल होतात. यावर उपाय करण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाने गरजू रूग्णांना अत्यावश्यक जेनेरीक औषधे तत्पर व माफक दरात मिळावी यासाठी भव्य जेनेरीक औषधी दुकान रूग्णालयातच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.