नांदेड : शासकीय रुग्णालयातील याच यंत्रणांनी कोविड सारख्या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून काम केले. त्यामुळे देशात नव्हे जगभरात महाराष्ट्राचे नाव झाले. मग आताच्या या मृत्यू तांडवावर यंत्रणेला दोष कसा देता? औषधी, डॉक्टर, परिचारिकांची रिक्त पदे ही त्याला कारणीभूत आहेत. त्यामुळे जबाबदारी निश्चित करून मंत्र्यांचे राजीनामे घ्या. तसेच नेमक्या काय उपाययोजना केल्यास भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यावरही चर्चा करा, असे आवाहन माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास माजी मंत्री आदित्य ठाकरे, विराेधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत हे विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम अधिष्ठाता आणि इतर डॉक्टर मंडळीशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. यावेळी ठाकरे म्हणाले, कोविड काळातील जे डॉक्टर आणि कर्मचारी होते. तेच आता आहेत, परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून औषधी खरेदीचा घोळ सुरू आहे. रिक्त पदांची संख्या वाढतच चालली आहे. ही पदे अद्याप भरण्यात आली नाहीत. आम्ही या ठिकाणी राजकारण करण्यासाठी आलो नाही. राजकारण करायचे असते तर मोर्चे, आंदोलने केली असती. परंतु भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून काय बदल करावे लागतील यावर चर्चा होण्याची गरज आहे, असेही ठाकरे म्हणाले.
डीन, डॉक्टरांवर कारवाई नकोघटनेच्या चौकशीसाठी समिती बसविली जाईल. समितीच्या अहवालानंतर डीन आणि डॉक्टरांवर कारवाई करण्यात येते. परंतु मंत्री मात्र नामानिराळेच राहतात. जीव तोडून काम करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यापेक्षा मंत्र्यांनी राजीनामे द्यायला पाहिजेत. कारण शासकीय रुग्णालयावर आजही गोरगरिबांचा विश्वास आहे. परंतु दहा दिवस झाले तरी, अद्याप मुख्यमंत्र्यांना इकडे यायला वेळ नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.