भोकर : तालुक्यातील कोणत्याही निवडणुकीत केंद्रस्थानी असणारे बहुजन नेते नागनाथ घिसेवाड यांचे काँग्रेस पक्षात पुनरागमन झाल्यामुळे शहरासह तालुक्यातील राजकिय समिकरण बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पालिकेच्या पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बहुमत मिळवून पहिल्या उपाध्यक्ष पदाचा मान घिसेवाड यांना दिला होता. त्यांनी आपल्या खास शैलीत शहर विकासाच्या दृष्टीने आक्रमक भूमिका घेत तत्कालीन प्रशासनावर वचक निर्माण केली होती. तरीही त्यांना डावलून पक्षश्रेष्ठींच्या मर्जीने पालिकेवर नवे कारभारी आले. त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी मनमानी कारभार केल्याचा आरोप प्रत्यारोप झाले. त्यात नोकरभरती, घनकचरा व्यवस्थापन, भुखंडाचे श्रीखंड असे विवादित प्रकरणे चव्हाट्यावर आल्यामुळे पालिकेच्या प्रतिमेला गालबोट लावून बरेच पाणी गेले. आता पुन्हा घिसेवाड यांचे पुनरागमन झाल्याने माजी कारभाऱ्यांच्या जोड गोळीच्या कारस्थानाला चाप बसणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दशकापूर्वी झालेल्या विधानसभा पुनर्रचनेनंतर भोकर तालुक्यातील राजकीय चित्र बदलले. भोकर, मुदखेड, अर्धापूर तालुक्यांचा समावेश भोकर विधानसभेत झाला. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने भोकरला पालिकेचा दर्जा मिळाला. तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्व मान्य करीत तालुक्यातील अनेक मातब्बर नेत्यांनी काँग्रेसचा हात हाती घेतला. त्यात दोन वेळा विधानसभेचा निसटता पराभव झालेले बहुजन नेते नागनाथ घिसेवाड यांचाही समावेश होता. पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले बहूमत मिळाले . परंतू अध्यक्षपद अनुसूचित जाती करीता राखीव असल्यामुळे घिसेवाड यांना उपाध्यक्ष पदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर अडिच वर्षांनी घिसेवाड यांची पालिकेच्या अध्यक्षपदाची वर्णी हुकल्यामुळे ते काँग्रेस पासून दुरावून भाजपात दाखल झाले होते. तेथील काही मित्रमंडळीच्या वर्चस्वामुळे अपेक्षित संधी मिळू शकली नाही. दरम्यान पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात अदृश्य हातभार लागल्याचा उहापोह खुद अशोकराव चव्हाण यांनी एका कार्यक्रमात केला होता. ते अदृश्य हात कोणते होते याचा उलगडा घिसेवाड यांच्या पुनर्प्रवेशाने स्पष्ट झाले आहे. शिवसेना, भारीप बहुजन महासंघ, काँग्रेस, भाजप आणि त्यानंतर पुन्हा काँग्रेस पक्षात पुनरागमन झालेले नागनाथ घिसेवाड कोणती खेळी खेळणार ? तसेच दोन वेळा विधानसभेचा निसटता पराभव झालेल्या तालुक्यातील मोठ्या नेतृत्वाला काँग्रेस पक्षश्रेष्ठी कसे सांभाळणार याकडे सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.