नांदेड- वन्यजीव संरक्षण अधिनियमाप्रमाणे घोरपड ही परिशिष्ट १ भाग २ मधील वन्यप्राणी आहे. त्यामुळे त्याच्या शिकारीवर बंदी आहे. असे असताना नांदेड शहरात जडीबुटी विकणाऱ्या दुकानावर घोरपडीचे गुप्तांग असलेली हत्था जोडी विक्री करण्यात येत होती. वनविभागाने डमी ग्राहक बनून या टोळीचा पर्दाफाश केला असून तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक बी.एन.ठाकूर यांना नांदेड शहरात हत्था जोडी विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वनपरीक्षेत्र अधिकारी सी.जी.पोतुलवार यांच्या पथकातील एका कर्मचाऱ्याला डमी ग्राहक बनवून पाठविण्यात आले. आरोपी स्वप्नील बाबूराव सूर्यवंशी (रा.आंबेडकरनगर नांदेड) याने रेल्वेस्टेशन परिसरात साडेतीन हजार रुपये या दराने हत्था जोडी विक्री केली. त्यानंतर पथकाने त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता आणखी आरोपींची नावे मिळाली.
कैलासनगर येथील दुकान चालक व्ही.व्ही.मोगडपल्ली आणि दुकानातील नोकर कैलास पुरभाजी कदम (रा.निळा) या दोघांना पकडण्यात आले. माेगडपल्ली मेडिको आणि किराणा स्टोअर्स येथे वनविभागाचे कर्मचाऱ्याने बनावट ग्राहक बनवून हत्था जोडी मागितली होती. त्यानंतर ७०० रुपये प्रमाणे हत्था जोडी दिली. यावेळी पथकाने दुकानातून हत्था जोडीचे तीन नग, पाया जोडी १५ नग आणि १ नग ब्लॅक कोरल जप्त केले. तिन्ही आरोपींच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.