कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी कोविड-१९ टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
या बैठकीस मनपा आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, महिला व बालविकास अधिकारी रेखा काळम, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. शिवशक्ती पवार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, मनपा उपायुक्त अजितपाल संधू उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तहसीलदार यांनी या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेऊन आपआपल्या तालुक्यातील माहिती दिली.
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील व्यक्तींची अधिक आर्थिक हेळसांड होऊ नये, यासाठी शासनाने प्राधान्याने सर्व विभागातील योजना एकत्रित राबवून जे लाभार्थी ज्या योजनेला पात्र होतील, त्या योजना त्यांना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही योजना अत्यंत महत्त्वाची असून, प्रत्येक तहसीलदारांनी आपल्या तालुक्यातील माहिती युद्धपातळीवर गोळा करुन ती तात्काळ सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिले.
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या १ हजार २० व्यक्तींच्या परिवाराला भेट देऊन माहिती गोळा करण्यात आली आहे. यातील ७१२ व्यक्तींच्या परिवारासाठी विविध शासकीय योजनांचे लाभ मिळावेत, याबाबत प्रस्ताव सादर केले जात असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी रेखा काळम यांनी दिली.